केडगावचे तरुण ‘हिंदी वेबसिरीज’मध्ये! सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांचा अभिनय क्षेत्रात ठसा

अब्बास शेख

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड हा दळणवळण आणि शेतीप्रधान म्हणून महत्व प्राप्त असलेला असा तालुका आणि या तालुक्यात असलेले केडगाव हे प्रगतशील असे अनन्य साधारण असे गाव. केडगावमधील युवावर्ग हा नवनवीन प्रयोग करण्यात आणि विविध क्षेत्रात आपले नावलौकिक मिळविण्यात यशस्वी झाले आहेत ही या गावची आणखी एक खासियत.

केडगावच्या अश्याच काही हरहुन्नरी तरुणांनी आता अभिनय क्षेत्रामध्येही आपले नशीब अजमावले असून ‘वेस्ट मार्केट एक अलग दुनिया कि कहाणी’ या हिंदी वेब सिरीजमध्ये हे तरुण आपल्याला दिसणार आहेत. हिंदी वेब सिरीज असलेल्या ‘वेस्ट मार्केट एक अलग दुनिया की कहानी’ या वेब सिरीजचे दिग्दर्शन डायरेक्शन, रायटिंग, म्युझिक हे सर्व अविराज काळे हे करीत असून प्रोड्यूसर म्हणून प्रमोद अबनावे काम पाहत आहेत. या वेब सिरीजमध्ये विजय टेंगले, राजू भनभने, विकास शेळके, गोपीनाथ हंडाळ, महादेव फणसे, जयदीप लबडे या तरुण कलाकारांनी काम केले आहे.

कमी वेळात जास्त पैसा मिळवणे आणि तो पैसा कुठल्याही वाईट मार्गाने मिळवणे हे या वेब सिरीजचे कथानक असून, मोबाईलच्या जमान्यात तरुणवर्ग पैसा मिळवण्यासाठी कसा वाईट मार्गाला जातो आणि त्यांना वाईट मार्गापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला कश्या पद्धतीने त्रास हे या प्रामुख्याने दाखविण्यात आले आहे.

या सिरीजमध्ये केडगाव येथील विकास शेळके या तरुणाची महत्वाची भूमिका असून त्याने या अगोदर ‘लागिर झालं जी’ या मालिकेत पोस्टमनची भूमिका केली आहे. अभिनय क्षेत्रात आपले नशीब अजमावणाऱ्या केडगावच्या तरुणांनी ते कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.