दौंड : दौंड शहरातील मुख्य चौकांमध्ये एका विशिष्ट जमातीतील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्या गैर वागणुकीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याचा येथील पोलीस प्रशासनापासून व्यापारी वर्ग व सामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यातील काही पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार करण्याकरिता सामान्य माणूस, व्यापारी घाबरत आहेत. अशा लोकांसमोर सर्वच हतबल झाले आहेत, त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे उपाध्यक्ष सतीश थोरात यांनी केली आहे.
पक्षाच्या वतीने दौंड पोलीस स्टेशन व दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन कार्यालयाला याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी पक्षाचे पदाधिकारी रोहित कांबळे, प्रकाश भालेराव,विकास कदम, तेजस कांबळे, नरेश डाळिंबे, समीर शेख, नागेश साळवे, भारत सरोदे ,राजू बारवकर आदि उपस्थित होते. निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, सध्या दौंड शहरातील संविधान चौक, हुतात्मा चौक, पोलीस स्टेशन समोरील परिसरामध्ये काही विशिष्ट समाजातील व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार दिवस रात्र पडून आहेत. दारूचे व्यसन करून यातील काही लोक रस्त्यावरच भांडणे, मारामाऱ्या करीत आहेत. अनेक वेळा यांची भांडणे चालू असताना यामधील महिला अंगावरील कपडे काढून नग्न अवस्थेतच रस्त्यावर येत असतात. हातात मिळेल त्या हत्याराने समोरच्या व्यक्तींवर हल्ला करणे असे प्रकार रस्त्यांवर भर दिवसा घडत आहेत ते सुद्धा पोलीस स्टेशन कार्यालयासमोरच. यांच्या भांडणामुळे व गलिच्छ भाषेतील शिवीगाळामुळे परिसरातील व्यापारी, महिलावर्ग, सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या लोकांना पोलिसांसह कोणाचेच भय नसल्याने त्यांचे हे गलिच्छ प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. यातील काही महिलांकडून व्यापारी, पुढारी मंडळींना टारगेट करून विनयभंग केला असल्याची धमकी देऊन, ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणीच उकळण्याचे प्रकार घडत आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे यांचा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दौंड रेल्वे परिसरातील तिकीट खिडकी, पादचारी पूल, रेल्वे स्थानकावरही यांनी अशाच प्रकारे उच्छाद मांडला आहे, त्यामुळे यांचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.