दौंड : 24 हजार के. व्ही. होल्ट विजेच्या तारे खाली काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेऊन तीन रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात दौंड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर अजय चौगुले (वय 20, रा.डोंनगाव, सोलापूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ओंकार चौगुले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
तर रेल्वे सुपरवायझर आसिफ रझा, अभियंता शंकर पासवान व हनुमंत आप्पा नाटेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दौंड लोहमार्ग पो. स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक युवराज कलकूटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 4 जुलै 2021 रोजी किशोर चौगुले, मालगाडी डब्यांची दुरुस्ती होत असलेल्या शेड (ROH) मध्ये काम करत होता. पेट्रोल -डिझेल वाहतूक करणाऱ्या डब्यावर चढुन तो ज्या ठिकाणी काम करीत होता त्या ठिकाणावरून अति उच्च दाबाची विजेची तार गेलेली होती. या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने चौगुले यास विजेचा जबर धक्का बसला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. नातलगांनी उपचारासाठी त्याला सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात भरती केले.
दि.19/7/2021 रोजी उपचारा दरम्यान त्याचा दवाखान्यात मृत्यू झाला. आसिफ रझा, शंकर पासवान व हनुमंत नाटेकर या रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या कामात निष्काळजीपणा दाखवून मयतास अतिउच्च दाब असलेल्या विजेच्या तारे खाली उभ्या असलेल्या पेट्रोल, डिझेल वाहतुकीच्या डब्यावर जोखमीचे काम सांगितल्याने चौगुले यास विजेचा मोठा धक्का बसला.
जखमी चौगुले याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने या तिघा अधिकाऱ्यांवर कलम 304 अ 337, 338 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विभागाचे रेल्वे व्यवस्थापकांना (DRM) घटनेची सूचना देऊन संबंधितांना अटक करणार असल्याची माहिती युवराज कलकूटगे यांनी दिली.