दौंड : दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी सर्वत्र सण- उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे केले जात आहेत. त्या अनुषंगाने दौंड शहरातही गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली, दौंड चे पो. निरीक्षक विनोद घुगे, यवत पोलीस स्टेशनचे पो. निरीक्षक नारायण पवार, राखीव पोलीस निरीक्षक सांगळे यांच्या नेतृत्वाने दौंड पोलिसांनी शहरातून संचलन केले.
यामध्ये 6 पोलीस अधिकारी, 58 पोलीस कर्मचारी,20 होमगार्ड सहभागी झाले होते. शहरातील संचालना आधी येथील रेल्वे कामगार मैदान येथे या पोलीस पथकाने उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठीच्या उपाययोजनांचे मॉक ड्रिल सादर केले.
गणेश भक्तांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनांचेही पालन करीत शहरातील कायदा सुव्यवस्था राखली जाईल याची काळजी घ्यावी व गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने यावेळी करण्यात आले.