पुणे शहरात ‘चंदन चोरी’ करणारी ‘दौंड तालुक्यातील’ ‘चंदन’ तस्करांची मोठी ‘टोळी’ पुणे पोलिसांनी पकडली, 95 किलो ‘चंदन’ जप्त

पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागातून चंदन चोरी करून विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तीनजण दौंड तालुक्यातील असून अन्य एकजण बारामती तालुक्यातील आहे.

पुणे कॅम्पसमधून चंदनाची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले असून या आरोपिंकडून 95 किलो चंदन आणि चंदन चोरीची पाच प्रकरणे उघडकीस आणत त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपिंमध्ये लहू तानाजी जाधव (वय 32), हनुमंत रमेश जाधव (वय 30), महादेव तानाजी जाधव (वय 30, सर्व रा.चौफुला चौक, धायगुडे वाडी, दौंड, जिल्हा पुणे), रामदास शहाजी माने (वय 28, बारामती) यांचा समावेश आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने सापळा रचून वरील आरोपिंना मुद्देमालासह जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे कॅम्पस मधून चोरीला गेलेली चंदनाची झाडे ही अशोक मच्छिंद्र तांदळे (वय ३०, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड) याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपिंनी चोरलेल्या चंदनाच्या झाडाचे खोड अशोक तांदळे याला विकले होते. गुन्हे शाखेच्या युनिट तीनला ही माहिती मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने तांदळे यांच्या घरी जाऊन तपासणी केली. पोलिस आले असता तांदळे घरात नसल्याचे दिसून आले. मात्र त्याची पत्नी तेथे उपस्थित होती. पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे अधिक चौकशी केली असता तांदळे याच्या घरातून 85 किलो चंदन मिळून आले ते पोलिसांनी जप्त केले. यानंतर सिंहगड रोड परिसरात ही चंदनाची झाडे तोडणाऱ्या चोरट्यांची टोळी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित या ठिकाणी सापळा रचून आरोपींना अटक केली.

पोलिसांनी आरोपिंकडून चंदनाची झाडे तोडण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड, दंताळे, रिकामी पोती आदी वस्तू जप्त केल्या आहेत. तसेच आरोपींकडून यावेळी दहा किलो चंदन ही जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, गंगा जगताप, संतोष क्षीरसागर, राजेंद्र माने, रामदास गोणते, शरद वक्षे, किरण पवार, सुजित पवार यांच्या पथकाने केली आहे.