अब्बास शेख
दौंड : केडगाव हे साधारण 25 हजार लोकसंख्या पार केलेले, मोठी बाजारपेठ असलेले एक मोठे गाव. या गावात विविध होलसेलर आणि रिटेलरची मोठमोठी दुकाने आहेत. या सर्व भावगर्दीत एक ‘छोटे’ मात्र ‘कर्तृत्वाने मोठे’ असे जगताप वस्तीवरील एक दुकान लोकांचे लक्ष वेधून घेते. ते दुकान म्हणजे ‘श्रीराम इलेक्ट्रिकल्स’ नावाचे विद्युत उपकरण दुरुस्तीचे दुकान.
या दुकानाची खासियत ही आहे कि हे दुकान केवळ 22 वर्ष वय असणारी उच्च शिक्षित एक युवती आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चालवत आहे. कुठलीही भीती किंवा कामाची लाज न बाळगता, आपले एम.कॉम चे उच्च शिक्षण आणि बँकिंगची परीक्षा देणारी ही उच्च शिक्षित मुलगी ज्यावेळी जड उपकरणे आणि इलेक्स्ट्रिकल वस्तू, फॅन, मिक्सर, कुलर, मोटर, पंखे, पॉवर टूल ग्राईंडर इत्यादी डेअरिंग करून खोलून ती दुरुस्त करते त्यावेळी ती समाजाने ब्राम्हण आहे आणि ती हे रांगडे काम इतक्या सहजतेने करत आहे यावर विश्वासच बसत नाही. ती आपल्या कार्यातून वडिलांना मुलाची गरजच भासू देत नाही हे विशेष.
दैनंदिन जीवनात वावरत असताना लोक काही काळाने जेव्हा भेटतात त्यावेळी एकदुसऱ्याला आवर्जून काही प्रश्न विचारले जातात आणि त्यातील प्रमुख प्रश्न म्हणजे अरे तुम्हाला मुलं, मुली किती? आणि जर समोरच्याने उत्तर दिले कि मला मुली आहेत मुलगा नाही. तर मात्र समोरील व्यक्ती आवर्जून म्हणते अरेरे.. फक्त मुली आहेत, मुलगा नाही? या एका प्रश्नाने मुलीच्या पित्याला कायम अपमानित झाल्यासारखे वाटते. मात्र तुमची तीच मुलगी जर मुला पेक्षाही जास्त काम करत असेल, उच्च शिक्षण घेत नाव लौकिक वाढवत असेल आणि तुमच्या रोजच्या कामाचा भार हलका करत असेल तर मात्र त्या पित्याची आणि त्या समाजाचीही मान गर्वाने उंचावल्याशिवाय राहत नाही.
ही माहिती आहे अश्याच एका केडगाव (ता.दौंड) येथील निडर आणि धाडशी ऋतुजा रुपेश दर्शने या अवघ्या 22 वर्षीय युवतीची.
ऋतुजाचे वय सध्या फक्त 22 वर्ष आहे. तिचे वडील रुपेश दर्शने यांचे गेल्या 15-16 वर्षांपासून ‘श्रीराम इलेक्ट्रिकल्स’ या नावाने केडगाव येथे दुकान आहे. केडगाव स्टेशन येथील जगतापवस्तीवर सध्या हे दुकान सुरु असून या दुकानामध्ये विजेवर चालणाऱ्या विविध उपकरणांची दुरुस्ती केली जाते.
या दुकानात तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्हाला तेथे या उपकरणांची दुरुस्ती करताना कोणी पुरुष अथवा मुलगा दिसत नाही तर अवघ्या 22 वर्षाची, ग्रॅज्युएशन पूर्ण करून एम.कॉम करत बँकिंगची परीक्षा देत असलेली ऋतुजा दर्शने ही सुंदर मुलगी दिसते.
ग्राहक तेथे गेल्यानंतर ऋतुजाला पाहून हमखास इकडे तिकडे पाहतात आणि आमचे हे उपकरण बिघडले आहे. हे दुरुस्त करणारे कुठे आहेत असा प्रश्न विचारतात. त्यावेळी ऋतुजा मोठ्या अदबीने हास्य करत अहो, मीच इथे हे दुरुस्तीचे काम करत असते असे म्हणून ते उपकरण दुरुस्तीला घेते त्यावेळी समोरील व्यक्तीचा विश्वासच बसत नाही कि ही अवघी 22 वर्षीय शिकलेली सुंदर मुलगी आणि ती हे जडाप्याचे काम कसे करते. मात्र ज्यावेळी उपकरण खोलून ते दुरुस्त करून ग्राहकांच्या हातात पडते त्यावेळी मात्र ग्राहकाच्या तोंडून, ‘जर अशी मुलगी असेल तर कशाला हवाय मुलगा’ हे उदगार आवर्जून निघल्याशिवाय राहत नाहीत.
आम्ही ज्यावेळी ऋतुजाला तिच्या दुकानावर भेटलो त्यावेळी ती काही जळालेली विद्युत उपकरणे आणि फॅन रिपेरिंगच्या कामात मग्न होती. तिच्या कामाची गती आणि कुशलता पाहून एखाद्या अनुभवी कारागीरालाही लाजवेल असा तिच्या कामाचा उरक होता. तिचे वडील रुपेश दर्शनी यांना दोनच मुली एक ऋतुजा आणि दुसरी इयत्ता 8वीत शिक्षण घेत असलेली तिची लहान बहीण. ऋतुजा ही लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावत होती. ती विद्युत उपकरणे दुरुस्तीचे कामही आपल्या वडिलांकडूनच शिकली. उच्च शिक्षण घेत असताना आपल्या वडिलांना तिने मुलाची कमी कधी भासूच दिली नाही. ग्रॅज्युएशन नंतर आज ती एम.कॉम. करत बँकिंगची परीक्षा देत आहे आणि आपल्या वडिलांचे दुकान आता स्वतःच चालवत आहे. तिचे कार्य पाहून ज्यांना फक्त मुलीच आहेत मुलगा नाही त्यांना निश्चितच यातून मोठी ऊर्जा मिळेल आणि तेही आपल्या मुलींना मुलाचा दर्जा देतील यात शंका नाही.