दौंड : दौंड तालुक्यातील पूर्व भागात वाळू माफियांनी येथील भीमा नदी पात्रात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू केल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा( पुणे, ग्रामीण)व दौंड पोलिसांनी त्यांना मोठा दणका दिला आहे.
लिंगाळी- मलटण हद्दीमधील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असलेल्या वाळू माफियांच्या अड्ड्यांवर या पथकाने कारवाई करून वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 फायबर बोटीना जलसमाधी देऊन वाळू माफियांच्या 6 ट्रक व अवैधपणे उपसा केलेली वाळू असा एकूण 72 लाख 33 रु. मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश मारुती शेंडगे, घनश्याम विश्वनाथ देवकाते, नवनाथ दगडू वाघमोडे, गोरख नामदेव वाघमोडे, आबा पांडुरंग सरोदे, गोरख अरुण वाघमोडे, संभाजी मनोहर येडे, तसेच ट्रक वरील फरार चालक-मालक यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायदा, खाण आणि खनिज अधिनियम 1957 चे कलम 4,21 व भा द वि 379,439,34 कलवान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिदपाटील, सहाय्यक फौ. बाळासो कारंडे, रविराज कोकरे,पो. हवा. आसिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, चालक राजापुरे या पथकासह दौंड पोलीस स्टेशनचे अमीर शेख, देवकाते, निखिल जाधव,पांडुरंग थोरात, विशाल जावळे यांनी कारवाई केली.