दौंड मधील खून प्रकरणी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची घटनास्थळी भेट, सुखेजा कुटुंबीयांना भेटून केले सांत्वन

दौंड : दौंडमध्ये दि. 26 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास येथील बीएसएनएल कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाची चोरट्यांनी हत्या केल्याची घटना घडली होती. प्रकाश सुखेजा (वय 60) असे हत्या झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव असून आज दि.27जुलै  रोजी पुणे जिल्हा ग्रा. चे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि चोरट्यांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेल्या सुरक्षारक्षक प्रकाश सुखेजा यांच्या कुटुंबीयांशी त्यांनी यावेळी संवाद साधला, त्यांच्याकडूनही त्यांनी घटनेची माहिती घेतली व त्यांचे सांत्वन केले.

पोलीस अधीक्षक देशमुख यांनी यावेळी  बीएसएनएल कार्यालय व वसाहतीची  फिरून पाहणी केली. यावेळी दौंड चे उपविभागीय पो. अधिकारी राहुल धस,पो. निरीक्षक विनोद घुगे उपस्थित होते. 

सदर घटना दौंड पोलिसांसाठी एक ब्लॅंक केस आहे. त्यामुळे यातील आरोपी पकडण्याचे मोठे आव्हान दौंड पोलिसांसमोर आहे. त्यातच बीएसएनएल कार्यालयाजवळ असलेले खाजगी हॉस्पिटल व शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने पोलिसांचे काम आणखीनच अवघड झाले आहे. शहरातील सर्व मोठ्या आस्थापनांनी आपल्या परिसरात सीसीटीव्ही लावावेत अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून याआधीच करण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस प्रशासनाच्या या सूचना कोणीही गांभीर्याने घेतलेल्या नाहीत अशी परिस्थिती आहे.

अशा परिस्थितीतही या प्रकरणाचा छडा लावून आरोपींना पकडले जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.