मुंबई : राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर मंत्री मंडळ विस्तारासाठी लागणाऱ्या वेळेचा गैर फायदा उचलून थेट आमदारांनाच 100 कोटींचा चुना लावण्याच्या प्रयत्न दौंडचे आमदार राहुल कूल यांच्यामुळे फसला आहे.
मुंबईच्या अती हुशार भामट्यांनी सत्तेत असलेल्या आणि मंत्रिपदासाठी दावेदार असलेल्या काही आमदारांची भेट घेतली आणि आम्ही दिल्लीवरून आलो असून मंत्रिपदासाठी तुमचे नाव रेसमध्ये असून तुमचा बायोडाटा वरिष्ठान्नी मागितला असून तुम्ही 100 कोटि दिले तर तुम्हाला मंत्रिपद मिळेल असे आश्वासन त्यांनी या आमदारांना दिले.
ही बाब आमदार राहुल कूल यांच्या कानावर पोहोचल्यानंतर त्यांनी ही गोष्ट आपल्या वरिष्ठ नेते मंडळींच्या कानावर घालून या पद्धतीने काही लोक 3-4 आमदारांना गंडा घालण्याच्या प्रयत्नात असल्याचे व आपणांस त्यांचा पर्दाफाश करायचा असल्याचे सांगितले.
यानंतर आमदार राहुल कूल व वरिष्ठान्नी हा सर्व प्रकार उच्च पोलीस अधिकाऱ्यांना सांगून त्यांना पकडण्याची व्यूहरचना आखली. मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी या भामट्यांनी 100 कोटी मागताना यातील 20 टक्के रक्कम आता द्यावी व उरलेली रक्कम ही शपथविधी सोहळा पार पडल्यावर द्यायची असे सांगितले होते. व्युह रचनेनुसार या आरोपींनी सोमवारी आमदारांना मुंबईतील नरिमन पॉइंटवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेल ओबेरॉयमध्ये नेले तेथेच सापळा रचून असलेल्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने यातील एका भामट्याला पकडले. त्याकडे अधिक चौकशी केली असता या प्लॅनमध्ये असलेल्या आणखी 3 जणांची नावे त्याने सांगितली.
पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली असून एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रियाज अल्लाबक्ष शेख (राहणार कोल्हापूर ) योगेश मधुकर कुलकर्णी (राहणार पाचपाखाडी, ठाणे) सागर विकास संगवई (राहणार ठाणे ) आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी (राहणार नागपाडा, मुंबई)या चार आरोपिंना अटक केली असून या आरोपींनी आत्तापर्यंत अजून किती आमदारांना फसवले आहे याचा तपास सुरु आहे.