अबब..महिला सावकाराची सुलतानी वसुली! 20 हजारांचे घेतले 5 लाख व्याज

कर्जत/अहमदनगर : सावकारकीची अनेक किचकट प्रकरणे आजपर्यंत आपण पाहिली असतील पण, एका महिला सावकाराने वसुल केलेल्या सुलतानी व्याजाच्या रकमेच्या आकडयाने कर्जत पोलीसही चक्रावून गेले आहेत. मुद्दलपोटी दिलेल्या २० हजारांच्या रकमेपोटी तब्बल ५ लाख रुपयांचे व्याज देऊनही या महिला सावकाराचे समाधान झाले नाही.

कोरोनाच्या काळात व्याजाची रक्कम देऊ न शकणाऱ्या एका कापड व्यापाऱ्याला व्याज व मुद्दलीच्या रकमेसाठी चक्क शिवीगाळ व मारहाण करण्याची घटना घडली आहे. याबाबत भगवान अर्जुन काकडे (रा.काकडेगल्ली, कर्जत) यांच्या फिर्यादिवरून महिला सावकारासह तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली विजय राऊत व तिचा मुलगा नाव रा.राशीन ता.कर्जत अशी गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकारांची नावे आहेत. फिर्यादीचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून सन २००० साली परिस्थिती हालाखीची असल्याने वैशाली राऊत हिच्याकडून २० हजार रुपये ५ रुपये टक्के दराने घेतले होते.

फिर्यादीने व्याजापोटी दर महिन्याला २ हजार रूपये भाजिविक्री करून सावकाराकडे जमा केले. मात्र सन २०१९ पासून कोरोना महामारीमुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने व फिर्यादीच्या मुलीचे शिक्षण सुरू असल्याने सावकाराला व्याज देऊ शकले नाहीत. दि.८ मे रोजी सावकाराने फिर्यादीच्या मुलीच्या फोनवर संपर्क करून 'तुम्ही घेतलेले पैसे का देत नाहीत? मुद्दल व व्याजाचे पैसे देऊन टाका उगाच वाद नको' असे सांगितले. यावर फिर्यादीने मी आत्तापर्यंत तुम्हाला ५ लाख रुपये दिले आहेत. पण थोडे दिवस थांबा पैसे आल्यावर मी तुमचे पैसे देऊन टाकतो' असे समजावले.त्यानंतर दि.२७ जून रोजी फिर्यादी कर्जतच्या बाजारात असताना माझे पैसे परत दे असे म्हणत महिला सावकाराने शिवीगाळ दमदाटी करून सर्वांसमोर गोंधळ घालून राडा घातला. त्यानंतर दि.४ जुलै रोजी फिर्यादी व त्यांची पत्नी बाजारात जात असताना त्यांना अडवून 'व्याजाचे पैसे व मुद्दल दे' असे म्हणत महिला सावकार वैशाली राऊत व तिच्या मुलाने शिवीगाळ करून तोंडावर झापड मारून मारहाण केली.त्यावेळी पत्नी सोडवण्यास आली असता तिलाही शिवीगाळ मारहाण केली.'तू जर पैसे दिले नाही तर तुम्हाला पाहून घेऊ' अशी धमकी देऊन शिवीगाळ करून गोंधळ घालून निघून गेले.

त्यांचे पैसे देण्याचा फिर्यादीने प्रयत्न केला पण रक्कम उपलब्ध झाली नसल्याने ते रक्कम देऊ शकले नाहीत.मात्र वारंवार व्याजाच्या रकमेसाठी त्रास देत असल्याने दोघांविरोधात कर्जत पोलिसात अखेर फिर्याद दिली आहे. कर्जत पोलिसांनी महिला सावकार व तिच्या मुलाविरोधात ३४१, २९४, ३२३, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच पोलीस जवान सलीम शेख भाऊ काळे मनोज लातूरकर ईश्वर माने शाहुराज तिकटे आदींनी केली आहे.