वारे पठ्ठया…
‘चोरी’ केली ती पण कशाची तर ‘स्मशान’ भूमितील प्रेत जाळण्याच्या ‘शव’ दाहिनीची! पण… पोहोचला मात्र थेट ‘पोलीस ठाण्यात’

यवत/दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे एक विचित्र चोरीची घटना घडली असून चोरायला काही मिळाले नाही म्हणून चोरट्याने चक्क येथील शव दाहीनीच चोरल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मात्र त्याची चोरी पकडली गेली असून याबाबत सचिन हनुमंत पवार (वय 42, रा.यवत स्टेशन रोड,यवत ता.दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि.8 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी अमोल
संजय पाथरकर (वय 22, रा.यवत,सहकारनगर ता.दौंड ) यवत येथील स्मशानभूमीत प्रवेश करून प्रेताचे अंत्यविधीसाठी ठेवलेली बीडाची शवदाहणी ही कशाच्यातरी सहाय्याने कट केली. आणि नंतर ती आपल्याकडे असणाऱ्या पोत्यात घालून चोरून घेवुन निघाला होता. हा प्रकार तेथील स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास अडवून त्याच्या पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यातून त्यांना शव जाळण्यासाठी आणलेली बिडाची शव दाहीनी आढळून आली.

या प्रकारानंतर उपस्थित नागरिकांनी त्याला थेट यवत पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवला. हि शव दाहीनी 20 किलो वजनाची असून तिची किंमत 10 हजार रूपये असून ती चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लोखंडे हे करीत आहेत.