Daund – सावंत नगर मधील स्मशानभूमी वादाच्या भोवऱ्यात, ‛या’ कारणामुळे प्रशासकीय मान्यता रद्द करण्याची मागणी



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी)

गोपाळवाडी रोड परिसरातील सावंत नगर येथे नव्याने होत असलेल्या स्मशान भूमीचे काम सुरू होण्या आधीच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. 

या ठिकाणी असणारा संपूर्ण हरित पट्टा बाधित होणार असल्याने जिल्हाधिकारी यांनी या कामासाठी दिलेली प्रस्तुत परवानगी तत्काळ रद्द करावी व हरित पट्ट्यात होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीस वेळीच अटकाव करण्यात यावा अशी मागणी दौंड मधील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक माने यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 दौंड शहर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक 70 या भूखंडात तथा दौंड सर्वे नं.175/5 पै या क्षेत्रात स्मशान भूमी सह गॅस शव दाहिनी, संरक्षण भिंत व इतर कामे विकसित करणे कामी प्रशासकीय मान्यता आदेश देण्यात आलेला आहे. सदरील क्षेत्रा लगतच्या  ओढ्याच्या पात्रा मुळे ग्रीन बेल्ट (हरित पट्टा) मध्ये येत असल्याने पर्यावरण विषयक नियम आणि इतर विविध नियमान्वये या हरित पट्ट्यात (आरक्षण क्र. 70) येणाऱ्या भूखंडा मध्ये किमान 30 मिटर अंतरात बांधकाम अनुज्ञेय नाही. 

या भूखंडात प्रशासकीय मान्यतेने बांधकाम होणार असल्याने या ठिकाणी असणारा हरित पट्टा बाधित होणार असल्याने आदेशातील अट क्र. 3 चा भंग झाल्याने प्रस्तुत परवानगी रद्द व्हावी तसेच या संपूर्ण क्षेत्रात रीतसर लेआउट मंजूर असून सदर लेआउट मधील मोकळी जागा (ओपन स्पेस) व स्मशान भूमीची जागा एकच असून याबाबत दौंड न.पा.च्या मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी यांनी संगनमताने या कामाचा प्रस्ताव सादर करताना या संबंधी दिशाभूल केलेली आहे. 

सदरहू जागा ही निश्चित लेआउट मधील ओपन स्पेस आहे की आरक्षण क्रमांक 70 नुसार स्मशान भूमीची आहे, की पोटखराबा आहे असा वाद निर्माण झाल्याने अट क्र. 2 चा भंग होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेली उपरोल्लेखित प्रशासकीय मान्यता तत्काळ रद्द होऊन पुढील कार्यवाही करण्यात येऊन हरित पट्ट्यात होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीस वेळीच अटकाव करण्यात यावा अशी मागणी विनायक माने यांनी पत्राद्वारे केली आहे.