केडगावमध्ये दोघांवर कोयत्याने सपासप ‘वार’

दौंड : दौंड तालुक्यातील केडगावमध्ये दोघांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दादा खंडू गरदडे आणि शिवराम माणिक वाघमोडे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून रहीम हुसेन शेख (रा.केडगाव स्टेशन ता.दौंड,पुणे) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी दादा गरदडे यांनी आरोपी रहीम शेख याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 27 जून रोजी सायंकाळी 4:30 च्या दरम्यान फिर्यादी दादा गरदडे व त्यांचा मेव्हणा शिवराम वाघमोडे हे दोघेजन केडगांव रेल्वेस्टेशन जवळील मुंजाबाचे देवस्थान येथील पिंपळाचे
झाडाखाली गप्पा मारत असताना तेथे आरोपी रहीम शेख याने येऊन फिर्यादी व त्यांचे मेव्हण्यास मला येथे बसायचे आहे तुम्ही येथून उठुन दुसरीकडे बसा असे म्हणाला त्यावेळी फिर्यादीने आरोपीला तु आमच्यापासून बाजुला बस असे म्हणाल्याच्या कारणावरून आरोपी रहीम शेख याने फिर्यादी व त्यांच्या मेव्हण्यास शिवीगाळ करीत तुम्हाला दाखवतो असे म्हणुन निघुन गेला.

मात्र सायंकाळी 5:30 च्या दरम्यान आरोपी हा अचानक फिर्यादी जवळ आला व फिर्यादी आणि त्याच्या मेव्हण्यास शिवीगाळ करून तुम्हाला लय माज आला आहे, तुम्हाला संपवतोच असे म्हणुन हातातील कोयत्याने फिर्यादीचे तोंडावर, गळयावर, सपासप वार करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीचा मेव्हणा शिवराम वाघमोडे हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असताना आरोपीने त्याच्याहि पाठीवर, कानावर, डोक्यात, कोयत्याने वार करून त्यालाही गंभीर जखमी करून तेथुन निघुण गेला असल्याचे दादा गरदडे यांनी फिर्यादित म्हटले आहे. या घटनेनंतर आरोपी विरुद्ध दादा गरदडे यांनी फिर्याद दिल्याने त्याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, विकास कापरे, विशाल जाधव, चोरमले, होळकर यांनी त्वरित पावले उचलून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे हे करीत आहेत.