‘पुत्र’ मोहातून गावांचे तुकडे नको – माऊली ताकवणे

दौंड : जिल्हा परिषद, पंचायत समिती गट रचना जाहीर झाली, मात्र गट म्हणून कायम आपली मक्तेदारी राखणाऱ्या केडगाव सारख्या मोठ्या गावाचेच दोन तुकडे करण्यात आले त्यामुळे हा डाव नेमका कुणाचा यावरून आता आरोप प्रत्यरोपांना सुरुवात झाली आहे. त्यातूनच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत हरकतीही नोंदविण्यात आल्या आहेत. हे सर्व होत असताना भाजप तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे यांनीहि या गट रचनेवर निशाणा साधला असून केडगाव सारख्या मोठ्या गावाचे दोन तुकडे आणि वाखारी केडगावपासून दूर करणे हे केवळ पुत्र मोहातून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण आहे.

केडगाव हे 28 हजारांची लोकसंख्या आणि 14 ते 15 हजारांच्या आसपास मतदान असणारे मोठे गाव. त्याच गावाचा भाग असलेले आणि काहीवर्षांपूर्वी वेगळी ग्रामपंचायत झालेले वाखारी हे गावही केडगावचाच एक भाग म्हणून ओळखले जाते. या दोन गावांची मतदार संख्याच जवळपास 18 हजारांच्या घरात जाते. इतके सर्व असूनही या गावचे तीन तुकडे केवळ पुत्र मोहातून करण्यात येऊन कोणत्याही परीस्थितीमध्ये रीस्क घ्यायची नाही असेच जणू नेत्यांनी ठरवलेलं दिसतंय असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी केला आहे. त्यामुळे केडगावचे दोन तुकडे आणि वाखारी गाव केडगावपासून अलिप्त ठेवणे हे कुणाच्या फायद्याचे आहे याबाबत मोठी चर्चा सुरु झाली असून या मागे नेमका हात कुणाचा यावरही बरीच चर्चा सुरु आहे.

जिल्हापरिषद, पंचायत समितीची गण आणि गट रचना जाहीर करण्यात आली आणि त्या रचनेत केडगाव हे दोन भागांमध्ये विभागले गेल्याचे समोर आले. विशेष म्हणजे केडगाव वाखारी हि गावे जोपर्यंत एकत्र होती तोपर्यंत येथील राणी हर्षल शेळके यांची विजयी घोडदौड कुणालाच रोखता आली नाही. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोनवेळा विजय मिळवला होता. त्यांच्यासमोर दिग्गज मंडळीनी आव्हान उभे करूनही त्यांना विजयापासून कोणी रोखू शकले नाही. मात्र आता या गट रचनेत केडगावच दोन ठिकाणी विभागले गेले आणि वाखारी अन्य गटाला जोडले गेले त्यामुळे येथील विविध पक्षातील इच्छुक नेते मंडळींचाही आपोआपच पत्ता कट झाला आहे.

केडगावचे दोन तुकडे करताना यातील पाटील निंबाळकर वस्ती, हंडाळवाडी, धूमळीचा मळा आणि देशमुख मळा हे पिंपळगाव – पारगाव गटाला जोडण्यात आले तर केडगाव गावठाण आणि केडगाव स्टेशन हे बोरीपार्धी – वरवंड या गटाला जोडण्यात आल्याने येथील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरल्याचे पहायला मिळत असून हा सर्व प्रकार जाणून बुजून केलेला असल्याचा आरोप भाजप चे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी केला आहे.

याबाबत काहींनी हरकतीही नोंदविल्या असून केडगाव गटाचे विभाजन झाल्यास याचा फायदा नेमका कुणाला होईल याबाबत आता तर्क वितर्क लावले जात असून माऊली ताकवणे यांचा रोख नेमका कुणावर आहे आणि निवडणुकीचे बाशिंग गुडघ्याला नेमके कोण बांधणार आहे ज्यामुळे इतका आटापिटा सुरु आहे याबाबत केडगाव पंचक्रोशीत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.