दौंड : श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्टच्यावतीने येथील दलित मित्र पुरस्कार प्राप्त स्वामी भक्त शांताराम जोगदंड गुरुजी यांना नामजप पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.5 हजार रु. शाल, श्रीफळ व पूर्ण पोशाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. गुरुजींनी श्री स्वामी समर्थ लिखित नामजप 7 लाख 41 हजार 712 इतक्या मोठ्या संख्येने लिहिल्याबद्दल त्यांना नामजप पुरस्कार देण्यात आला असल्याचे मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष वैभव कांबळे यांनी सांगितले.
येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विधिज्ञ ऍड. विलास बर्वे, ऍड. अमोल काळे, ऍड. सचिन साने,मा. नगराध्यक्ष दत्तात्रय सावंत, अशोक गायकवाड, बाळासो साळुंखे, सुधीर साने, सुनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैभव महाराज कांबळे म्हणाले की, जर कोणी स्वामी भक्तांना जपनाम लिखाण करावयाचे असेल तर मंदिराच्या वतीने त्यांना मोफत वहया देण्यात येतील.
विलास बर्वे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शांताराम जोगदंड गुरुजींनी वयाच्या 75व्या वर्षी जपनाम लिहिण्यास सुरुवात केली ते आज ही वयाच्या 87 व्या वर्षी जपनाम लिहण्याचे कार्य करीत आहेत ही कौतुकास्पद व प्रेरणादायी बाब आहे.
12 वी बोर्डाच्या परीक्षेत 92% गुण मिळवून यश मिळविणाऱ्या अमितेश अमोल काळे याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. अनेक स्वामी भक्तांनी जपनाम लिहिण्यासाठी वह्यांची मागणी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी भक्त कल्याण कटके यांनी केले, सूत्रसंचालन व आभार सुधीर साने यांनी केले.