दौंड : दौंड तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागाच्या खोलीमध्ये एका शासकीय महिला कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून मारहाण करणारी व्यक्ती सुद्धा महिलाच असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. राणी लक्ष्मण कोकणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.15 जून रोजी दुपारी 12:15 च्या दरम्यान दौंड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाच्या खोलीमध्ये शासकीय कर्मचारी राणी कोकणे ह्या शासकीय कामकाज करत असताना चेतना सोनवणे (पुर्ण नाव माहीत नाही, रा. दौंड जि. पुणे) नामक महिला त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज घेवुन आल्यानंतर त्यांना कोकणे यांनी, ज्या व्यक्तीचा अर्ज आहे त्या व्यक्तीला पाठवुन द्या व अगोदर ४० रू. चे चलन भरा.’ असे समजावुन सांगितले. त्यावेळी या गोष्टीचा राग येऊन सदर आरोपी महिलेने टेबलावर हाताने आपटुन, टेबलावरील कागदपत्रे विस्कटुन कागदपत्रे खाली पाडुन फिर्यादीला शिवीगाळ केली आणि तु लई शहाणपणा करतेस, तुझ्याकडे बघुनच घेते असे म्हणुन धमकी देवुन फिर्यादीच्या अंगावर येवुन त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर सदर महिला पुरवठा विभागाच्या खोलीतुन पळुन गेली असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
यावेळी कोकणे यांनी, सदर महिला हि, मी माझे शासकिय काम करीत असताना माझे वर दहशत पाडुन, शासकिय कर्मचाऱ्यांनी आपले काम करु नये म्हणुन माझ्या अंगावर येवुन शासकिय कामात अडथळा केला आहे असे आपल्या जबाबात म्हटले असून त्यांनी चेतना सोनवणे यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास दौंडचे पोलीस हवालदार गायकवाड हे करीत आहेत.