प्रसिद्ध गायक सिद्धू मोसेवाला खून प्रकरणातील संतोष जाधवला गुजरातमधून अटक, 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी

सहकारनामा

पुणे : प्रसिद्ध गायक सिद्धू मोसेवाला (siddhu mosewala) याची हत्या (murder) करणाऱ्यांमध्ये पुण्यातील संतोष जाधव (santosh jadhav) आणि महाकाळ (mahakal) यांची नावे आल्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली होती. यातील महाकाळ याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती तर रविवारी रात्री संतोष जाधव यासही गुजरात मधून अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्यास 20 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संतोष जाधवला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जेरबंद करण्यात आले आहे.

पंजाबच्या सिद्धू मोसेवाला या प्रसिद्ध गायकाची भर दिवसा हत्या झाल्यानंतर संतोष जाधव हा एका रात्रीतच प्रकाश झोतात आला. कारण सिद्धू मोसेवाला याची हत्या झाली यावरच लोकांचा विश्वास बसतो न बसतो तोच या हत्याकांडात थेट पुण्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील दोघांची नावे पुढे आल्याने सर्वचजण अवाक झाले होते. आणि त्यातून संतोष जाधव आणि महाकाळ यांची नावे पुढे आली.

मात्र जसजसे या खुनातील पहलू उलगडू लागले तसतसे सत्य समोर येऊ लागले आणि सिद्धू मोसेवाला याची हत्या करण्यासाठी विविध राज्यांतून आठ शार्पशुटर आल्याची माहिती समोर आली. यात संतोष जाधव आणि महाकाळचेही नाव पुढे आले ज्यात काही दिवसांपूर्वी महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले.

मात्र तरीही संतोष जाधव याचा तपास काही केल्या लागत नव्हता त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दल त्याच्या मागावर होते आणि अखेरीस त्यांना आज यश आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिद्धू मोसेवाला खून प्रकरणातील संशयीत संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली.  रविवारी रात्री उशिरा त्याला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यास 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी जाधवच्या टोळीतील आणखी एकाला अटक केल्याची माहितीही समोर येत आहे.