|सहकारनामा|
पुणे (दौंड) : शिवसेनेचे बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी दलित समाज विरोधी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी दौंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने याबाबतचे निवेदन दौंड पोलिसांना देण्यात आले.
निवेदनात आमदार संजय गायकवाड यांनी खामगावच्या दलित अत्याचार प्रकरणात गुंडा सारखी व चिथावणीखोर भाषा वापरली आहे. दलित कार्यकर्त्यां विरोधात चोरीचे, रॉबरीचे खोटे गुन्हे दाखल करा म्हणजे दलित समाज ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेतील असे वादग्रस्त आवाहन केले असल्याचे नमूद केले आहे.
लोकप्रतिनिधींना असे वर्तन शोभत नसून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आमदार संजय गायकवाड यांची भूमिका मान्य नसेल तर पक्षाच्या माध्यमातून त्यांचे निलंबन ठाकरे यांनी करावे व प्रशासनानेही गायकवाड यांच्या विरोधात दलित समाज विरोधी भाषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन खरात, शहराध्यक्ष प्रवीण धर्माधिकारी, फिरोज तांबोळी, अभय भोसले, राम देवडे उपस्थित होते.