|सहकारनामा|
पुणे : दौंड तालुका हा तसा सर्व सुख, सुविधांनी परिपूर्ण असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात इंग्रजांच्या काळापासूनच असणारी रेल्वे, हॉस्पिटल्स, नॅशनल हायवे, कॅनॉल अशा माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या बाबी असल्याने हा तालुका सुजलाम, सुफलाम झाल्याचे पाहायला मिळते मात्र आता या सुजलाम, सुफलाम तालुक्याला सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टोळीचे ग्रहण लागले असून हि टोळी विविध हॉटेल्स, लॉजिंग आणि मोबाइलच्या माध्यमातून येथील युवा, तरुण पिढीला आपल्या जाळ्यात ओढून अक्षरशा वाम मार्गाला लावत असल्याचे अनेक घटनांवरून समोर येऊ लागले आहे.
दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवर असणाऱ्या अनेक मोठ्या हॉटेल, लॉजवर हे सेक्स रॅकेट चालत आहेत. पोलिसांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला जातो, मात्र काही दिवसांत पुन्हा ते नव्या जोमाने सुरू होते त्यामुळे हे इतक्या किरकोळ करवाईवर थांबणारे आहे का ? असा प्रश्न कुणी केला तर याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. कारण हे सेक्स रॅकेटचे जाळे दौंड तालुक्यातून हद्दपार होण्यासाठी एका माजी जिल्हापरिषद सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली काहींनी याबाबत आवाज उठवला आहे. मात्र या जिल्हा परिषद सदस्यांना सेक्स रॅकेट चालविणाऱ्या टीमच्या एका म्होरक्याने.. हमारी पोहोंच बहुत उपरतक है, हमारा कोई कुछ नही बिगाड सकता! हर जगह हमारे लॉज, हॉटेल्स है, हमे यह नया नही है… असे म्हणत काही केले तरी आमचे धंदे थांबणार नाहीत असे आव्हानच जणू देऊन टाकले आहे. जर हे लोक एका लोक प्रतिनिधीला असे आव्हान देत असतील तर त्यांची मजल कुठपर्यंत गेली आहे हे न सांगितलेलेच बरे.
त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर हे सर्व कुणाच्या तरी कृपाशीर्वादाने सुरू असेल आणि सेक्स रॅकेट चालविणारे हे लोक बाहेरून येऊन पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील हॉटेल्स आणि लॉज मोठी रक्कम देऊन भाड्याने घेत तेथे खुला वेश्या व्यवसाय सुरू करून युवा, तरुण पिढीला बरबाद करण्यात कुठलीच कसर सोडत नसतील तर त्यांच्यावर आता कठोरात कठोर कारवाई होणे हि काळाची गरज बनली आहे.
कारण हि आग आज ना उद्या आपल्या सुद्धा घरापर्यंत येऊन आपल्या मुला बाळांचा संसार उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे असे सेक्स रॅकेट चालविणाऱ्या हॉटेल आणि लॉज मालकांवर मोक्का किंवा तशाच प्रकारच्या कठोर कारवाईची गरज असल्याचे मत या माजी जिल्हा परिषद सदस्यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना व्यक्त केले आहे.