|सहकारनामा|
दौंड : ज्यावेळी कोरोनाची दुसरी लाट शिखरावर होती त्यावेळी कोरोना रुग्णांचे मित्रमंडळीच काय नातेवाईक सुद्धा कोरोना रुग्णाजवळ फिरकत नव्हते त्यावेळी मी दादांना कोरोना रुग्णांजवळ जाऊन त्यांना धीर देताना पाहिलंय असे प्रतिपादन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी आज चौफुला येथे केले. पुढे बोलताना त्यांनी कोरोना काळात राज्यात सर्वात जास्त मदत हि कोणत्या तालुक्याला मिळाली असेल तर ती आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून दौंड तालुक्याला मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ते दौंडचे माजी आमदार स्व.सुभाष अण्णा कुल यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्त बोलत होते.
रविवार दि. 4 जुलै रोजी मा.आ.स्व.सुभाष अण्णा कुल यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त चौफुला येथील दीपगृह कोविड सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपापल्या माध्यमातून कोरोना काळात नागरिक आणि समाजाची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला यात ‛सहकारनामा’ चे संपादक अब्बास शेख आणि ‛सहकारनामा’ चे दौंड शहर प्रतिनिधी अख्तर काझी यांचाही आमदार राहुल कुल, मा.आमदार रंजनाताई कुल आणि कांचनताई कुल यांनी कोविड योद्धा म्हणून सन्मान केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमा पाटसचे संचालक विकास शेलार यांनी सुभाष अण्णा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांना गहिवरून आले. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ.दीपक जाधव यांनी बोलताना दादांनी 19 वर्षांपूर्वी वैद्यकीय कॅम्प घेण्याची योजना आखून ती यशस्वीपणे अमलात आणली जी सुरू असल्याचे आवर्जून नमूद केले.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी स्व.सुभाष अण्णा कुल यांच्या दूरदृष्टीक्षेपावर बोलताना ज्यावेळी तालुक्यात सर्वत्र पाणी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होत होते त्याहीवेळी सुभाष अण्णांचं पाण्यावरच काम सातत्याने सुरू होतं आणि एकदिवस तालुक्याला पाणी टंचाई जाणवू शकते हे गृहीत धरून त्यांनी विविध योजना राबवून त्यातील अनेक योजना अमलात आणल्या होत्या ज्याचा आज आपणासर्वांना फायदा होत असल्याचे सांगितले. आमदार कुल यांनी विकास कामांबाबत माहिती देताना बेबी कॅनॉल चे 24 कोटीचे काम हे सुरू झाले आहे, तालुक्यातील रस्ता, आरोग्य बाबत कामे चांगली सुरू असल्याचे आणि भीमा पाटसचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगितले.
कोरोना काळात काम करताना मला माझ्या सहकाऱ्यांची चांगली मदत लाभली, तसेच आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वांची मोठी मदत झाली असून चौफुला येथील कोविड सेंटरचा मोठा फायदा नागरिकांना झाला. यात डॉ.भांडवलकर यांचे मोठे सहकार्य झाल्याचे आणि चौफुला येथील कोविड सेंटर यापुढेही लोकांच्या सेवेसाठी सुरूच राहील असे नमूद केले.
मा.आ.स्व.सुभाष अण्णा कुल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येतात 10 तारखेला आरोग्य कॅम्प घेण्यात येणार असून या कॅम्पमध्ये 83 लोकांना बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल (3 चाकी गाडी) देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब चोरमले यांनी केले.