दौंड
अख्तर काझी
दौंड शहरात अतिक्रमण होत असलेल्या जागी दौंड नगरपालिकेने कारवाई केली मात्र आता हेच धाडस शहरात अतिक्रमण करणाऱ्या, बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या बाबतीत सुद्धा नगरपालिका दाखवणार का आणि कधी असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.
दौंड नगरपालिकेने, शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत शहरातील छोट्या व्यापार्यांवर, हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, हातावर पोट असणाऱ्यांच्या रोजी-रोटीवर यामुळे परिणाम होणार असून या लोकांना कोणीही वाली नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहे.
शहरातील रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या, नगरपालिका किंवा सरकारी जागेत अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमण धारकांवर नगरपालिकेने कारवाई केली याचे कौतुकच आहे आणि अशी कारवाई झाली सुद्धा पाहिजे असेही सर्वसामान्य नागरिकांना वाटते. मात्र नगरपालिकेने सदरची कारवाई करण्याचे जे धाडस दाखविले तेच धाडस अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या तसेच बिल्डरांच्या बाबतही दाखविले पाहिजे असेही सर्वसामान्य लोकांना वाटते.
शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांच्या बेकायदेशीर बांधकामा विरोधात नगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. कित्येक बिल्डरने आपल्या बांधलेल्या इमारती मधील फ्लॅटधारकांसाठीच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक गाळे काढून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. याबाबतीतही नगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त आहेत. शहरातील काही इमारतींचे बांधकाम नगरपालिकेने मंजूर केलेल्या नकाशा प्रमाणे नाही. अनेक व्यवसायिक इमारतींना पार्किंगची सोय नाही. अशाही तक्रारी नगरपालिकेकडे आल्या आहेत. मग अशा बिल्डरांच्या इमारतींवर नगरपालिका कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाही? असा सवाल सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे काढल्याने रस्ते मोकळा श्वास घेत आहेत, मात्र कारवाई करताना नगरपालिकेकडून दुजाभाव नको अशी मागणी होत आहे. शहरातील रस्त्यांवर, चौकामध्ये अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने, हात गाड्या नगरपालिकेने हटविल्या आहेत, मात्र कारवाईनंतर पुन्हा त्याजागी अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी दिला आहे. नगरपालिकेने कारवाई दरम्यान तोंड बघून कारवाई केली आहे या आरोपाचे त्यांनी खंडन केले आहे.
नगरपालिकेच्या या कारवाईबाबत चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दौंडकरांकडून येत आहेत. कारवाईमध्ये ज्यांची दुकाने, हात गाड्या गेल्या त्यांचे संसार मात्र रस्त्यावर आले आहेत अशी परिस्थिती आहे. दुकान विकत किंवा भाड्याने घेण्याची ज्यांची ऐपत नाही त्यांनी यापुढे करायचे काय असा सवाल हात गाड्यावर व्यवसाय करणाऱ्यांना पडला आहे. शहरातील रस्त्यांना अडथळा होणार नाही, किंवा इतरांना त्रास होणार नाही अशा जागेत यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी अशाही प्रतिक्रिया दौंडकर देत आहेत.