केडगावच्या ‘दोन तुकड्यांवरून’ मोठी ‘खळबळ’… गाव एक मात्र दोन ठिकाणी विभागल्याने कार्यकर्ते नाराज, नेमका डाव कुणाचा!

दौंड

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा दौंड तालुक्यातील गट व गण रचना जाहीर करण्यात आली असून दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि मिनी शहर समजल्या जाणाऱ्या केडगावचे दोन तुकडे झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे तर नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

केडगावमध्ये 6 वार्ड असून यातील 4 वार्ड हे पिंपळगाव – पारगाव गटाला जोडले असून 2 वार्ड हे बोरीपार्धी – वरवंड गटाला जोडले गेले आहेत. पारगाव – पिंपळगाव गटामध्ये हंडाळवाडी, पाटील-निंबाळकर वस्ती, धूमळीचा मळा आणि देशमुख मळा असे 4 वार्ड जोडण्यात आले असून बोरीपार्धी – वरवंड गटाला केडगाव आणि केडगाव स्टेशन असे 2 वार्ड जोडण्यात आले आहेत. त्यामुळे केडगाव हा गट असणारा विभाग आता स्वतःची ओळख हरवून दोन गटांमध्ये सामील करण्यात आल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत.

काहींच्या मते हे केडगावला खच्ची करण्याचे काम करण्यात आले असून मुख्य बाजारपेठ आणि भरपूर लोकसंख्या असणारा केडगाव गट आता स्वतःचीच ओळख हरवून बसला आहे. याबाबत अजून नेते मंडळींच्या प्रतिक्रिया आल्या नसल्या तरी कूल – थोरात गटातील कार्यकर्ते मात्र अस्वस्थ झाले आहेत.