दौंड – अख्तर काझी
रेल्वेमधून प्रवास करीत प्रवाशांच्या ऐवजांची व पैशांची लूट करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीच्या दौंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मुंबई, वसई, विरार रेल्वे हद्दीमध्ये गुन्हे करणारी टोळी दौंड मध्ये येणार असल्याची खबर येथील पोलिसांना मिळाली होती.
टोळी येथील गोवा गल्ली परिसरात येताच दौंड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 23 हजार रु. रोख ,7 मोबाईल संच व आयडिया आणि जिओ कंपनीचे 48 नवीन सिम कार्ड पोलिसांनी हस्तगत केले. विनोद सतबीर सिंग, राकेश महावीर, हंसराज दुपसिंग, दीपक सुनव राकेश, राजेश रोशन कुमार(सर्व रा. हरियाणा), महिंद्र सोनू मुंशीराम(रा. दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हरियाणा- दिल्ली येथील या गुन्हेगारी टोळीने संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला होता, बऱ्याच दिवसांपासून ते पोलिसांना गुंगारा देत होते. ही टोळी शहरातील गोवा गल्ली परिसरात येणार असल्याची खबर येथील पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई, वसई, विरार रेल्वे हद्दीत चोरीचे 5 गुन्हे केले असल्याचे कबूल केले. या टोळीने राज्यात इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता असल्याचे पो. नि. विनोद घुगे यांनी सांगितले. टोळीकडून मुद्देमाल व चोरी करण्यासाठी त्यांनी वापरलेली हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
दौंड पोलिसांनी पुढील कारवाईसाठी या टोळीला मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयातील मुंबई -भाईंदर, युनिट 7 च्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे,पो. उप. निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कर्मचारी पांडुरंग थोरात, सुभाष राऊत, महेश भोसले,अमोल गवळी, नारायण वलेकर, किशोर वाघ, अभिजीत गिरमे, निलेश वाकळे व चालक देसाई या पथकाने कामगिरी केली.