दौंड : अख्तर काझी
दानापूर एक्सप्रेस गाडीने मनमाडहुन दौंड ला आलेल्या दोन प्रवाशांना येथील कॉर्डलाईन स्टेशनजवळ मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना घडली. प्रवाशांकडून आरोपींबाबत मिळालेल्या माहितीवरून दौंड लोहमार्ग पोलिसांनी तासाभरातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
करण कैलास चव्हाण (वय 22,रा.3 नं. शाळेजवळ, रेल्वे ग्राउंड दौंड), रोहित चंद्रकांत गायकवाड (वय 30,रा. संभाजीनगर,गोवा गल्ली दौंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फिरोज जगदीश यादव(रा. मेटपुरी,ता.रजवली,जि. नवादा, बिहार) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या साथीदारासह दि.29 मे रोजी रात्री 12.30 वा. च्या सुमारास दानापूर एक्सप्रेस गाडीने मनमाडहुन दौंडला कामानिमित्त आले. येथील कॉर्ड लाईन स्टेशनवर दोघे उतरले असता रेल्वे स्टेशन जवळच आरोपींनी फिर्यादी यांना अडविले व बॅग मे क्या है असे विचारीत एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात तर दुसऱ्या आरोपीने छाती वर दगडाने प्रहार करीत त्यांना मारहाण केली व खिशातील मोबाईल व रोख रक्कम (रु.710) असा एकूण 25, हजार 709 रु चा ऐवज लुटून नेला.
येथील लोहमार्ग पोलिसांना गुन्ह्याची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी यांची विचारपूस करून घटनेची व आरोपींची माहिती घेतली. दोघा आरोपींच्या मिळालेल्या वर्णनावरून( बरमूडा, टी-शर्ट, शरीरयष्टी जाड) पोलिसांनी कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन व परिसरामध्ये आरोपींचा कसून शोध सुरू केला असता, दौंड- पाटस रोडवरील एस.आर.पेट्रोल पंपा जवळ एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. दुसऱ्या आरोपीच्या घराचा पत्ता मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. पोलिसांना पाहून त्याच्या घरच्यांनी तो रात्रीपासून घरीच आलेला नाही असे सांगितले परंतु पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरातील बाथरूम मधील एका मोठ्या रांजना मध्ये तो लपून बसलेला असल्याचे पोलिसांना आढळले. रांजणातून बाहेर काढत त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींविरोधात भा. द.वि. 394,34 ( जबरी चोरी व मारहाण) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना जन्मठेपेची सजा होऊ शकते अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांनी दिली.
पुणे लोहमार्ग,पो. अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड,पो. उप. निरीक्षक श्रीकांत वाघमारे, पोलीस कर्मचारी आनंदा वाघमारे, मनोज साळवे, सुनील कुंवर या पथकाने कामगिरी बजाविली.