दौंड
दौंड तालुक्यातील वाखारी या गावात असणाऱ्या पीर देवस्थान जमिनीत मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू भट्ट्या कार्यरत असून त्या गावठी दारू भट्टयांवर यवत पोलिसांकडून अनेकवेळा मोठ्या प्रमाणावर कारवाई केली गेली आहे. मात्र तरीही काही दिवसानंतर या गावठी दारू भट्ट्या पुन्हा त्याच देवस्थान जमिनीत सुरु होण्यास नेमका कोणत्या स्थानिकाचा आशीर्वाद आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे.
हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पीर शादावली बाबा देवस्थान जमिनीत या दारू भट्ट्या राजरोसपने सुरु असल्याने येथील नागरिकांकडूनहि याबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
पीर देवस्थानच्या जमिनीत असलेल्या ओढ्या शेजारी आणि पाणीपुरवठा विहिरी लगत असलेल्या काटेरी झुडूपांमध्ये या दारू भट्ट्या असून येथे मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या गावठी दारू तयार केली जात आहे. हा सर्व प्रकार होत असताना हि जमीन कसणारे मात्र याला विरोध का करत नाहीत हा खरेतर संशोधणाचा विषय आहे. यामागच्या गौडबंगाला बाबत येथील नागरिकांनी खुलासा केल्यानंतर मात्र कपाळावर हात मारण्याव्यतिरिक्त पर्याय उरत नाही.
त्यामुळे या देवस्थान जमिनीत दारू भट्ट्या कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत आणि त्यास विरोध न करता उलट त्या या जमिनीत चालू राहण्यासाठी कोण अभय देतंय याची माहिती घेऊन संबंधित लोकांवर सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
त्या ठिकाणी पोलिसांची कारवाई झाल्यानंतर पुन्हा दारू भट्ट्या सुरु..
यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या पथकाने या दारू भट्टयांवर अनेक वेळा कारवाई करत त्या उध्वस्त केल्या आहेत मात्र काही दिवसानंतर पुन्हा त्या जागेत या गावठी दारू भट्ट्या सुरु होत असल्याने या दारू भट्ट्यांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवरच कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा या देवस्थान जागेत दारूभट्ट्या लावल्या जाणार नाहीत अशी मागणी होत आहे.