दौंड
दौंड मधील व्यापाऱ्याची 2 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेणाऱ्या काष्टी येथील दरोडेखोरांच्या टोळीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दौंड मधील व्यापारी कांतीलाल पारसीया व त्यांच्या सोबत असणाऱ्या मुलाला येथील धनश्री बियर बार समोर अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेली होती. ओंकार वाघमोरे,सिद्धार्थ आकोटे, समद तांबोळी, व सागर धेंडे (सर्व रा.काष्टी, तालुका श्रीगोंदा) अशी याप्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि.29 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वा. दरम्यान येथील व्यापारी कांतीलाल पारसीया व त्यांचा मुलगा काष्टी येथील आपले दुकान बंद करून दौंड कडे येत असताना दौंड हद्दीतील सोनवडी गाव परिसरातील धनश्री बियर बार समोर दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा 2 लाख 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता. तेव्हापासून सदर गुन्ह्याचा तपास दौंड पोलीस करीत होते.
गोपनीय बातमीदार मार्फत खबर मिळाली की सदरचा गुन्हा काष्टी येथील आरोपींनी केला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यामध्ये त्यांचे आणखीन दोघे साथीदार सामील असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार या सर्व आरोपीं विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल व इतर आरोपींचा दौंड पोलिसांकडून शोध सुरू आहे.
अटक आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची(30 मे पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण चे पो. अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पो.अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पो. अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक विनोद घुगे,पो. उपनिरीक्षक शहाजी गोसावी, महेश आबनावे,पो.कर्म. सुभाष राऊत, अमोल गवळी, निखिल जाधव, आदेश राऊत, अमोल देवकाते, अभिजीत गिरमे, रवींद्र काळे या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक महेश आबनावे करीत आहेत.