अंधत्वाला कमजोरी न समजता त्यावर यशस्वी मात करत बनले मुंबई मंत्रालयात अधिकारी – राम लवांडे यांचा थक्क करणारा प्रवास

दौंड

जर एखाद्याला अंध्यत्व आले तर ती व्यक्ती खचून जातो, जगण्याची आशा सोडते आणि असले जगणे जगण्यापेक्षा मरण आलेले बरे असे म्हणत मरणाची वाट पाहत बसते… मात्र अश्या लोकांसाठीच नव्हे तर सर्वच लोकांसाठी खोर येथील राम लवांडे हे एक प्रेरणा आहेत.

राम लवांडे यांनी अंधत्वावर मात करत जिद्दीने काटेरी प्रवास केला. कोणतीही गोष्ट मिळताना त्यांनाही प्रतिक्षा करावी लागली. दुःख आणि अपमान सहन करत असताना यशस्वी होण्यासाठी मात्र त्यांनी प्रयत्न करायचे सोडले नाही आणि मग तो दिवसहि उजाडला जो त्यांच्या यशाचा साक्षीदार होता. हे आम्ही सांगत नाही तर राम लवांडे हे स्वतः याबाबत बोलत होते आणि त्यांनी अंध्यत्वावर मात करत यश कसे खेचून आणले हेही यावेळी त्यांनी खुटबाव ता. दौंड येथील संतराज कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देताना त्यांनी तुम्हीही प्रयत्न करा.. यश मिळण्यासाठी चिकाटी व संयम गरजेचा आहे, त्यातून यश आत्मसात करता येते, सध्या मी मोबाईल, लॅपटॉप सफाईदारपणे वापरतो. त्याचा मला खूप फायदा झाला. एमपीएससीद्वारे मंत्रालयात नोकरी लागल्यानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला अश्या पद्धतीने त्यांनी आपल्या आयुष्यातील एक एक गोष्ट मुलांसमोर मांडली.

राम लवांडे हे दौंड तालुक्यातील खोर येथील रहिवासी आहेत. सध्या मुंबई मंत्रालयात गृह खात्यात ते कार्यरत आहेत. ते एमपीएससीची आणखी कर सहाय्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्याने या पदाची देखील दिवाळीनंतर संधी असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एमकेसीएलचे विभागीय अधिकारी विश्वजित उत्तरवार, पुणे जिल्हा समन्वयक सुरज लाकाळ, साधू सूळ, भूषण शेलार व खुटबाव परिसरातील MSCIT चे विध्यार्थी यावेळी आवर्जून उपस्थित होते.