अख्तर काझी
दिल्ली आणि पंजाब या राज्यातील निवडणुकीमध्ये चांगले यश मिळाल्यानंतर आम आदमी पार्टी आता आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने दौंड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यास पक्षाचे पुणे जिल्हा संयोजक मुकुंद किर्दत, दौंड शहर व तालुका संयोजक रवींद्र जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधताना मुकुंद किर्दत म्हणाले की, दौंड शहराच्या विकासाचा रस्ता हायवेने निघून गेला आहे , तो विकास तुमच्या दौंडमध्ये यायला पाहिजे असे वाटत असल्याने शहरात आम आदमी पार्टी संघटना बांधणी करीत आहे. आगामी नगरपालिका निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार आहे. शहराच्या विकासासाठी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना येथे न आणता या शहरातीलच कार्यकर्त्यांना केजरीवाल बनवायचे आहे असे ते म्हणाले.
भारतीय जनता पार्टी तसेच महा विकास आघाडी च्या बाबतीत बोलताना मुकुंद म्हणाले की हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोघांचे राजकारण एकाच दिशेने जात आहे. त्यांचा चेहरा पाहता एकाने धर्मांधतेचा चेहरा घेतला आहे आणि एकाने तो मुखवटा घेतलेला नाही, परंतु धोरण तेच आहे. विकासाच्या संदर्भातील त्यांच्या संकल्पना या सगळ्या सारख्याच आहेत. सामान्य माणसाचा विकास घडवायचा असेल तर त्याच्यावरचे प्रश्न ऐरणीवर येणारच नाहीत असे वातावरण या दोघांकडून निर्माण केले जात आहे. निवडणुकीच्या काळामध्ये हे प्रश्नच पुढे येणार नाहीत. भोंग्याचे प्रश्न निर्माण होतील, आणि सर्व चर्चा त्या दिशेला जाईल. किंवा एकमेकांच्या विरोधातील सिडी वरून दमदाटी चे राजकारण महाराष्ट्राच्या सत्ता कारणांमध्ये सध्या दिसत आहे. आणि म्हणून जनतेला निश्चित वाटत आहे की, या दोन्ही आघाडी, युती मध्ये काहीही फरक नाही.
म्हणून जनताच आता आम आदमीला पर्याय म्हणून स्वीकारेल. जनताच म्हणू लागली आहे की आम्हाला आम आदमीला चान्स द्यायचा आहे असे मुकुंद किर्दत म्हणाले. यावेळी दौंड मधील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव यांना दौंड शहर व तालुका संयोजकाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी जाहीर केले.