प्राणी मित्रांनी वाचविले चिंकाऱ्याचे प्राण

अख्तर काझी

दिनांक १० मे २०२२ रोजी खडकी ता. दौंड जवळ रोड अपघातात एक चिंकारा हरीण जखमी झाले होते. प्राथमिक तपासणी मध्ये असे दिसून आले की त्याला मुक्कामार लागला होता आणि खर्चटल्याच्या जखमा होत्या. त्याला फार इजा न झाल्याने येथील प्राणी मित्र संस्था इको यांनी त्यावर प्राथमिक उपचार करायचे ठरविले. गाडीच्या धडकेने तो जास्त घाबरलेला होता त्यामुळे त्याला स्टेबल करणं गरजेचं होतं. त्यामुळे इको संस्थेचे अध्यक्ष नचिकेत अवधानी यांनी त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक उपचार करून एका शांत खोलीमध्ये ठेवले.
RESQ Charitable trust , pune येथील पशवैद्यकीय डॉ. सुश्रृत शीरभाते सर यांच्या निगराणी खाली पुढील ५ तास ठेवण्यात आले. चिकारा हरीण सुस्थितीत येईपर्यंत त्यावर निगराणी करण्यात आली. वनविभाग अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या सहकार्याने काल सायंकाळी ७ वा दौंड जवळील माळरानाच्या परीसरात चिंकारा हरीण पुन्हा निसर्गात मुक्त करण्यात आले. या वेळी इको टीम चे अनिकेत तुपे , नचिकेत अवधानी, प्रशांत कौलकर , गणेश सांगळे, अक्षय बोराटे, गायत्री अवधानी हे सर्वजण उपस्थित होते.
चिंकारा निसर्गात मुक्त होण्याचे क्षण अगदी कमी पाहण्यास मिळतात. कारण चिंकारा ही खूप भित्री जात आहे, अनेक वेळा चिंकारा हे उपचारा अभावी, उपचारासाठी घेऊन जाताना प्रवासादरम्यान, भीतीपोटी किंवा उपचारादरम्यान मृत्युमुखी होतात. जखमी चिंकारा चा जगण्याचा दर अतिशय कमी प्रमाणात आहे असे प्राणी मित्रांनी सांगितले.
दौंड आणि परीसरात मागील काही महिन्यात अनेक चिंकारा विविध कारणांमुळे रेस्क्यू करण्यात आले त्यामध्ये काही चिंकारा पाण्याच्या शोधार्थ विहिरीमध्ये पडतात, काहींचे रोड एक्सीडेंट, कुत्र्याच्या चाव्यामुळे, विषबाधा झाल्यामुळे, उष्णतेच्या कडाक्यामुळे तसेच तारांच्या कुंपणामध्ये अडकून अनेक चिंकारा जखमी अथवा प्राण गमावलेल्या अवस्थेत सापडतात. परंतु या साऱ्या गोष्टींवर मात करून त्यामधील काही चिंकारा वाचवण्यात इको संस्थेला यश आले आहे.या मध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, वन विभाग दौंड यांचे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले.