कपडे धुवायला गेलेल्या ‘पोलीस पाटलाच्या’ कुटुंबातील 5 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

सहकारनामा प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-कल्याण जवळ संदप गावात असलेल्या पाण्याच्या दगडी खाणीत बुडून गावच्या पोलीस पाटलाच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 लहान मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड यांच्या पत्नी मीरा गायकवाड, त्यांची सून अपेक्षा गायकवाड, नातू मोक्ष, निलेश आणि मयुरेश हे पाचही जण तेथील एका दगड खाणीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. खाणीवर गेल्यानंतर हे पाचही जण खाणीतील पाण्यात पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र या पाचही जणांना वाचविण्यात त्यांना यश आले नाही आणि रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्या पाचहि जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
एकाच कुटुंबातील 3 लहान मुले आणि 2 महिलांचे मृतदेह बाहेर काढताच एकच हल्लकल्लोळ माजला. उपस्थित नागरिकांना ते दृश्य पाहण्याच्या पलीकडे होते त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींसह गावकरीही मोठ्याने रडू लागले.
सध्या या भागात पाण्याचे दूर्भीक्ष असल्याने हे कुटुंब कपडे धुण्यासाठी त्या दगड खाणीवर जात होते. आज त्याच पाण्यात त्यांचा घात झाला आणि पाचही जणांची प्राणज्योत मालवली.
केवळ पाणी टंचाईमुळे या पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यामुळे ग्रामस्थांमधून कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.