दौंड : दोन दिवसांपूर्वी उरुळी कांचनमध्ये चोरट्यांनी दरोडे घालून लूटमार केल्याने हवेली तालुक्याला लागून असलेल्या दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात यवत पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या स्टाफने रात्रीच्यावेळी गस्त घालताना ग्रामसुरक्षा दलाचे सर्व कार्यकर्ते, पोलीस पाटील हे सतर्क असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
यवत पोलीस स्टेशनच्या अख्त्यारीत येणारा भाग हा शेती आणि वाड्या, वस्त्यांनी विखुरलेला आहे त्यामुळे सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि ग्राम सुरक्षा दलाच्या गस्त घालाव्यात असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.
यवत पोलीस गस्त घालत असताना खामगाव व कासुर्डी या दोन बीटमध्ये पोलीस व ग्राम सुरक्षा दलाच्या जवांणासह बीट ऑपरेशन राबवण्यात आले.
रात्रगस्त दरम्यान नांदूर गावाला पोलिसांनी भेट दिली असता गावचे पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे जवान आढळून आले. पोलिसांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिलेल्या असून खामगाव, कासुर्डी, सहजपूर, बोरीभडक, बोरीऐदी, नांदूर, डाळिंब गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाच्या वतीने गावचे पोलीस पाटील व ग्राम सुरक्षा दलाचे जवान हे सतर्क होऊन गस्त घालत असल्याने पोलिस निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.