पुणे : रेल्वे विभागाशी निगडित विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेख़ाली व पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीम. रेणू शर्मा, वरिष्ठ यातायात अधिकारी श्री.ओम गुप्ता, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक श्री. सुनील मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे बैठक पार पडली यावेळी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांकडे दौंड विभागासाठी विविध मागण्या केल्या.
ज्यामध्ये पुणे -दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या व विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने –
१. दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टी धारक कुटुंबियांच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा, त्यांचे पुनर्वसन करावे व पुनर्वसन होईपर्यंत रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे खाली करण्यात येऊ नयेत.
२. सुवर्ण चतुर्भुज (Golden Quadrilateral and Diagonal – GQGD) योजनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील ८ रस्त्यांवरील रेल्वे क्रॉसिंग वर रोड ओव्हर ब्रिज (ROB) / रोड अंडर ब्रिज (RUB) उभारण्यात यावेत.
३. पुणे-सोलापूर मार्गावरील दौंड जंक्शन येथे तिसऱ्या मोरीचे काम दोन वर्षांहून अधिक काळापासून प्रगतीपथावर आहे आवश्यक संरचना आणि पुशिंग बॉक्स तयार आहेत त्यामुळे संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी मेगा ब्लॉकसाठी मंजुरी द्यावी.
४. दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी..
५. दौंड नगरपरिषदेने दौंड येथे पुणे-सोलापूर लाईनवर बांधण्यात येत असलेल्या नवीन आरयूबीच्या लगतच्या परिसरात पाणी पुरवठा व ड्रेनेज लाईन जोडणीचे काम डिपोजीट वर्क अंतर्गत करण्याची विनंती केली आहे, तिसऱ्या मोरीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे त्यासोबत पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाइन जोडणीच्या डिपोजीट वर्क कामास परवानगी दयावी.
६. दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या मेमु लोकलचे दर पूर्वीप्रमाणे २० रूपये करावेत व पुणे – हैद्राबाद – पुणे (AC सुपर फास्ट), मुंबई – चेन्नई – मुंबई सुपरफास्ट, LTT – विशाखापट्टणम सुपर फास्ट आदी लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा दयावा.
७. वाढती लोकसंख्या व नागरीकिकरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅक चे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळी च्या मध्ये सहजपुर ,उरुळी आणि लोणी च्या मध्ये नायगाव, मांजरी आणि हडपसर च्या मध्ये अमनोरा आदी नवीन स्थानकांची निर्मिती करावी अश्या विविध मागण्या आमदार राहुल कूल यांनी त्यांकडे केल्या.
यातील सर्व मागण्यांच्या बाबत रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती यावेळी आमदार राहुल कूल यांनी दिली.
यावेळी राज्यमंत्री मा. श्री. विश्वजीत कदम, खासदार मा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार राहुल कूल, आमदार श्री. भिमराव तापकीर, आमदार श्री. संजय जगताप, माजी आमदार श्री. योगेश टिळेकर, श्री. बाळा भेगडे, श्री. जगदीश मुळीक, माजी नगरसेवक श्री. योगेश कटारिया, दौंड पुणे प्रवासी संघाचे श्री. विकास देशपांडे, श्री. गणेश शिंदे आदी उपस्थित होते.