अनुकंपावरील नियुक्त्या त्वरित करण्यात याव्या : आमदार राहुल कूल

पुणे : अनुकंपावरील नियुक्त्या त्वरित करण्यात येऊन भरती प्रक्रिया सुरु करण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी राज्यशासनाकडे केली आहे.

कोविड – १९ महामारीच्या काळात गेले २ वर्षे राज्यातील पदभरतीस बंदी घालण्यात आली होती. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खासगी, अल्पसंख्याक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील सर्व पदांना हा नियम लागू करण्यात आला होता तसेच अनुकंपा तत्वावरील भरती देखील बंद करण्यात आली होती.

कोव्हीड कालावधी मध्ये कर्त्यव्य बजावताना अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी बांधवांचा कोव्हीड मुळे मृत्यू झाला असून, सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील नियुक्ती पासून वंचित आहेत. दि. २६ ऑगस्ट २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी कार्यपद्धती निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामान्य प्रशासन विभाग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे पत्राद्वारे केली.