धक्कादायक : पुण्यात ‘बोगस गुंठेवारीचा’ मोठा भांडाफोड, 10 हजार बोगस दस्त नोंदणी! दुय्यम निबंधक कार्यालयातील 44 अधिकाऱ्यांचे निलंबन

पुणे : पुण्यात बोगस NA ऑर्डर चे प्रकरण ताजे असतानाच आता त्यात भर पडून बोगस गुंठेवारी दस्तनोंदणीचं रॅकेट उघड झालं आहे. यामध्ये सुमारे 10 हजार गुंठेवारी दस्त बोगस असल्याची माहिती समोर आली असून यात दुय्यम निबंधक कार्यालयातील 44 अधिकाऱ्यांवर निलंबन आणि चौकशीची कारवाई करण्यात आली आहे.
दस्त नोंदणीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी झाल्यामुळे पुण्यात मोठी खळबळ माजली आहे. 10 हजार बोगस गुंठेवारी दस्त नोंदणी ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचं उघड झाले आहे. या सर्व प्रकरणात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचे समोर येत आहे.
पुणे जिल्हा आणि ग्रामीण भागातील अनेक प्रकरणांचा यात समावेश असून नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी सुमारे 44 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई केली आहे.
बोगस दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता हे बोगस दस्त रद्द करण्यात येणार की यात दस्त नोंदणी करणाऱ्या एजंट,आणि मालकांवरही कारवाई होणार का याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.