Double Murder in Patas – पाटस गावातील 2 मुलांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या : दौलत नाना शितोळे यांची मागणीजय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने दौंड मध्ये निषेध सभेचे आयोजन



|सहकारनामा|

दौंड : ज्या समाजामध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक जन्माला आले ज्यांनी सर्व समाजांसाठी आत्मबलिदान दिले, फासावर गेले. याच समाजामध्ये बहर्जी नाईक यांचा जन्म झाला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहास घडविताना सर्वात जास्त मदत केली त्याच समाजातील दोन निष्पाप मुलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या रामोशी समाजावर एवढी चीड का? असा उद्विग्न सवाल जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी उपस्थित केला. 

पाटस गावांमधील दोन मुलांची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ दौंडमध्ये आयोजित निषेध सभेत शितोळे बोलत होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी नानासो मदने, सुरेखा जाधव, तृप्ती भंडलकर, अनिल माकर, रामदास खोमणे, शंकर पवार, वंचित बहुजन आघाडीचे अश्विन वाघमारे तसेच तालुक्यातील बहुसंख्य रामोशी समाज उपस्थित होता.

दौलतनाना शितोळे म्हणाले की, 21- 22 वर्षाची हे दोन मुलं (शिवम शितकल, गणेश माकर) कधी दारूला हात न लावणारी, टवाळक्या न करणारी, परंतु फक्त रामोशी समाजामध्ये जन्माला आली, रामोशी समाजाचे रक्त त्यांच्या अंगात होते आणि समोरच्याने आव्हान दिले होते की तुमच्यामध्ये दम असेल तर या ठिकाणी येऊन दाखवा आणि म्हणून ही दोन मुले त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी असलेल्या 10 ते 12 जणांनी त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना दगडाने ठेचून त्यांची क्रूर हत्या केली. सर्वांना मदत करावयाची असेल तर रामोशी उभा, कोणी आरोपी सापडत नसेल तर पोलिसांना रामोशी समाज पुढे येऊन मदत करतो. एवढी मदत करून आज समाजाच्या पदरी काय आहे तर फक्त चीड. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून या निषेध व शोक सभेचे आयोजन केले आहे. स्वतः करीता कमी व दुसऱ्या साठी ज्यादा करणारा हा समाज आहे तरीही रामोशी समाजावर सतत अत्याचार होत आहेत त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याचे कवच रामोशी समाजाला देण्यात यावे अशीही मागणी दौलत नाना यांनी केली. 

समाजाला सांगणे आहे हे दुहेरी हत्याकांड आहे यामध्ये पोलीस कोणालाही मदत करू शकत नाही, ना कोणी पुढारी फोन करू शकतो. या घटनेच्या तपासामध्ये जो कोणी अधिकारी चूक करेल तो घरी बसेल एवढे निश्चित. पोलिसांनी 24 तासात मुख्य आरोपींना अटक केली आहे त्यामुळे पोलीस खात्यावर विश्वास आहे. कायद्यापुढे कोणी मोठा नाही त्यामुळे या घटनेतील सर्व आरोपींविरोधात मोका अंतर्गत कारवाई व्हावी व सदरचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविला जावा व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असेही दौलत नाना म्हणाले. 

मनात ज्‍वाला भडकत आहे, रोष आहे परंतु आपला या सरकारवर व पोलीस प्रशासनावर विश्वास आहे त्यामुळे आपणाला जे काही करायावयाचे आहे ते लोकशाही मार्गानेच करायचे असा सल्लाही दौलत नाना शितोळे यांनी समाजाला यावेळी दिला.