दौंड मधील अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर,
नगरपालिकेने सफाई न करताच उद्यान खुले केल्याने बच्चे कंपनीला धोका!

अख्तर काझी

दौंड : शहरातील दौंड नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमेव उद्यान म्हणजे जनता कॉलनी परिसरातील अण्णाभाऊ साठे उद्यान. या उद्यानाच्या दुरवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येत आहे. उद्यानाची संपूर्ण साफ सफाई करून उद्यानातील लाईटची व्यवस्था सुरू झाल्या नंतरच उद्यान सर्वांसाठी खुले करावे अशी मागणी यावेळेस येथील जनता कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच जनता कॉलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणीसुद्धा निवेदनातून करण्यात आली आहे.
नगरपालिकेला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, अण्णाभाऊ साठे उद्यान कोरोना मुळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात रानटी झाडे व गवत वाढलेले आहे. यामध्ये साप, विंचू सारखे घातक प्राणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे मात्र त्याची सफाई झालेली नसल्याने उद्यानामध्ये खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना व त्यांच्या पालकांना या प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे, म्हणून उद्यानाची सफाई व दिवे सुरू करूनच उद्यान खुले करावे.
जनता कॉलनीतील अंतर्गत रस्ता, रस्ते विकास महामंडळाने भूमिगत गटारातील पाईप लाईन टाकण्यासाठी खोदलेला होता, ज्यामुळे डांबरीकरण केलेला रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. सदरचे काम झाल्यानंतर या ठिकाणचे खड्डे फक्त मुरूम टाकून बुजविण्यात आले आहेत. ज्यामुळे परिसरामध्ये धुळीचे साम्राज्य झाले आहे. वाहनांच्या वाहतुकीमुळे सर्वांच्या घरांमध्ये धुळ उडून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. परिसरातील रस्त्यांचे पुन्हा एकदा डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिक करीत आहेत. तसेच मनमाड- बेळगाव राज्य महामार्ग लगतच्या इतर वसाहतींच्या नावाचे फलक रस्ते महामंडळाने लावलेले आहेत, जनता कॉलनी सुद्धा याच महामार्गालगत असल्याने जनता कॉलनी चाही फलक या ठिकाणी लावण्यासाठी नगरपालिकेने रस्ते महामंडळास सूचना करावी अशी मागणीही नागरिकांनी निवेदनातून केली आहे.