पहिले लग्न लपवून ‘महिलेने’ केले युवकाशी ‘दुसरे लग्न’! ‘प्रशांत शेळके’ची फसवणूक झाल्याने व्हिडीओ बनवून केली त्याने ‘आत्महत्या’, महिलेसह 4 जणांवर ‘गुन्हा दाखल’

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव देशमुख मळा येथील युवक प्रशांत शेळके याची एका महिलेने फसवणूक करून स्वतःचे पहिले लग्न झाले असतानाही प्रशांत शेळके याच्याशी दुसरे लग्न करून त्यास मानसिक व आर्थिक त्रास देऊन छळवणूक केल्याने या युवकाने अखेर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची गंभीर घटना केडगावमध्ये घडली आहे.
या प्रकरणी मृत प्रशांत शेळके याचे वडील संपत विठ्ठल शेळके (रा.केडगाव, देशमुख मळा ता.दौंड ) यांनी फिर्यादी दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपत शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा प्रशांत शेळके याची पत्नी भाग्यश्री दत्तात्रय पिसे, सासू स्वाती दत्तात्रय पिसे, सासरे दत्तात्रय विठ्ठल पिसे (सर्व केडगाव स्टेशन, ता.दौंड,पुणे ) व प्रदीप भिवा नेवसे (रा.बोरिपारधी, ता.दौंड) यांनी भाग्यश्री हीचे पहीले लग्न झाले असल्याचे लपवुन ठेवुन प्रशांत शेळके याच्या बरोबर दुसरे लग्न करून देवुन फसवणुक केली. तसेच त्यास वेळोवेळी पैशाची मागणी करून त्याला त्रास देण्यात आला. या सर्व प्रकाराला कंटाळून प्रशांत याला त्याचे जिवन जगणे असह्य झाल्याने त्याने वरील आरोपिंच्या त्रासाला कंटाळून बोरमलनाथ मंदीराचे परीसरात स्वतःच्या मोबाईलवर व्हिडीओ बनवत औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावर उपचार सुरु असताना त्याचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
संपत शेळके यांच्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपिंवर फसवणूक करणे,आत्महत्येस प्रवृत्त करणे, अश्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस करीत आहेत.