दौंड पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

दौंड : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रिपब्लिकन जनशक्ती मेळावा व डॉ बाबासो आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा.प्रा.जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, दौंडचे आमदार राहुल कुल, मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे, प्रदेश युवक अध्यक्ष संजय सोनवणे तसेच शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष महेश पासलकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) चे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सतीश थोरात उपस्थित होते. समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाज सेवकांना मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासो आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.


रिपब्लिकन जनशक्ती मेळाव्यास उपस्थित भीमसैनिकांना मार्गदर्शन करताना प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, आपला रिपब्लिकन पक्ष जोडण्याचे काम करतो, निवडणूका लागल्या की वाद-विवाद जरूर करा परंतु जेथे राज्याचा व शहराच्या विकासाचा प्रश्न असेल तिथे मात्र एकजुटीने काम करा. कवाडे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राज्यातील महा विकास आघाडी वर यावेळी सडकून टीका केली. दौंड मधील पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोलताना ते म्हणाले की कोणाच्या तरी सांगण्यावरून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे, गुन्हेगार असेल तर त्याला जरूर अटक करा, जेलमध्ये टाका प्राध्यापक कवाडे काही बोलणार नाही पण कोणाच्या तरी खोट्या तक्रारीवरून पक्षाच्या कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ कवाडे यांच्याशी आहे हे विसरू नका. आम्ही पोलिसांवर पडणारे दगड आमच्या छातीवर झेलले आहेत, परंतु पोलिसांना इजा होऊ दिली नाही असे काम आम्ही पोलिसांसाठी करतो. काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे राज्याचे गृहमंत्री जेलमध्ये आहेत, काही उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी खोटी कामे केली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत हे ध्यानात ठेवा.


ते पुढे म्हणाले की, पक्षाची ताकद अशी निर्माण करा जे तुम्हाला आज विचारत नाहीत ते उद्या हात जोडून तुमच्याकडे मदतीला आले पाहिजेत. स्वप्ने पाहणे बंद करू नका, स्वप्न पहा सत्ता काबीज करण्याचे, परंतु मंजिले उनिको मिलती है जिनकी सपनो मे जान होती है, उडान पंखो से नही हिम्मत और होसलो से होती है….हे विसरू नका म्हणूनच एकजुट ठेवा व समता- बंधूतेच्या दिशेने राजकारणाची वाटचाल करा. ही भूमिका पीपल्स रिपब्लिकन पार्टी व बाबासाहेब आंबेडकरांची आहे ,तीच भूमिका शहरातील राजकारणाचा प्रचंड अनुभव असणारे प्रेमसुख कटारिया यांची सुद्धा आहे असा आम्हाला विश्वास आहे.
राजकारणात विरोधक असतात मात्र शत्रू नसतात. महाराष्ट्र संतांची, थोर पुरुषांची भूमी आहे येथे सर्वांचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका ठेवा. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, प्रश्न असा पडतो, अजून पर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही.

डॉ.बाबासाहेबांनी या देशाची राज्यघटना लिहिली, लोकशाही निर्माण केली, राजकीय समानता निर्माण झाली परंतु जोपर्यंत राजकीय समानते सोबत आपल्या देशामध्ये सामाजिक व आर्थिक समानता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आमच्या देशाचे स्वातंत्र्य टिकू शकणार नाही हा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना प्रदान करताना दिला होता. पहाट झाली म्हणता दिवस कोठे आहे, दिवस उगविला म्हणता परंतु सूर्य कुठे आहे, गुलामी संपली म्हणता मग स्वातंत्र्य कुठे आहे, हे देशाचे मोठे दुःख आहे. आमचे एवढेच म्हणणे आहे, आमची गोर, गरीब जनता जी कष्टाची भाकर मिळवते ती भाकर कमीत कमी इज्जतीने खाण्याचा अधिकार तरी त्यांना द्या दुसरे काय मागतो आम्ही असेही कवाडे म्हणाले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी, युवक जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे व पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.