पिता-पुत्राचा कारनामा, मारुती गाडीतून करत होते दारू ची विक्री! पुणे ग्रामीण विशेष पथकाकडून 4 लाखाच्या मुद्देमालासह पिता-पुत्रा जेरबंद

पुणे : मारुती इको गाडीतून दारू वाहतूक करून त्याची विक्री करणाऱ्या पितापुत्राला पुणे ग्रामीण च्या विशेष पोलीस पथकाकडून मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेकडून नेमण्यात आलेले विशेष पथकास माळेगाव ता.भोर येथे नसरापूर-वेल्हा रोड नजिक गावठी हातभट्टी दारू वाहतुक व विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. व त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशावरून ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन विशेष पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी सायबर पोलीस स्टेशनचे नेमलेले विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड, सचिन गायकवाड यांनी दारू वाहतुक करणाऱ्या इसमांची व मारुती इको वाहनाची माहिती काढून दिनांक २४ फेब्रुवारी रोजी ०९.०० वा.चे सुमारास नसरापूर-वेल्हा रोड परिसरात सापळा रचून माळेगाव ता.भोर जि.पुणे येथे मानवी शरीरास घातक अशी गावठी हातभट्टीची दारू वाहतुक व विक्री करीत असलेले दोघे आरोपी १.निरंजन हनुमंत शेटे (वय ३२ वर्षे) २.हनुमंत नथुराम शेटे (वय ५५ वर्षे, दोघेही रा.नसरापूर शेटे आळी ता.भोर जि.पुणे) यांना त्यांचे कब्जातील मारुती इको नंबर एमएच-१२ एन.पी. १३२९ यासह ताब्यात घेवून गावठी हातभट्टी तयार दारू व वाहनासह एकूण किं. ४,००,८००/- (चार लाख आठशे) रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोघे आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल हा पुढील कारवाईसाठी राजगड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून आरोपींविरूध्द भा.दं.वि. कलम ३२८ सह मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींनी सदर गावठी दारु कोठून आणली? त्यांचे आणखीन कोण साथीदार आहेत? याबाबतचा अधिक तपास करणेसाठी अटक आरोपींना भोर येथील कोर्टात हजर केले असता मे.कोर्टाने एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व सहा.फौजदार संजय ढावरे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड, सचिन गायकवाड व सुनिल कोळी यांनी केलेली आहे.