दौंड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकार क्षेत्रामध्ये देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेकडून देण्यात येणाऱ्या विविध सोईंमुळे 90% शेतकरी आणि व्यवसायिक, व्यापारी हे या बँकेला पसंती देत आहेत.
केडगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचाही ग्राहकांना चांगला अनुभव येत असून या शाखेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे त्वरित काम होत असल्याने येथे त्यांचा वेळ वाचत असून त्यामुळे गर्दी होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.
अनेक ग्राहक तसेच पैसे भरण्यासाठी/काढण्यासाठी येणारे शेतकरी, व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिक या बँकेच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. अन्य बँकांमध्ये पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी ग्राहकांना तासंतास लाईनमध्ये थांबावे लागते आणि इतके करूनही किरकोळ चुकांसाठी कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा ऐकण्याची तयारी मनाशी ठेवावी लागत असल्याने येथील अनेक ग्राहक आता पुन्हा PDCC बँकेकडे वळताना दिसत आहेत.
या बँकेत गर्दी होऊन लोकांची हेळसांड होऊ नये म्हणून शाखा व्यवस्थापक राजेंद्र धुमाळ आणि सह शाखा व्यवस्थापक संजय गरदडे हे जातीने लक्ष देत असतात. संजय गरदडे यांनी शिस्तबद्ध नियोजन ठेवल्याने येथे ग्राहकांना तासंतास ताटकळत उभे रहावे लागत नाही हे विशेष. येथील कर्मचारी वर्गही ग्राहकांच्या अडचणी समजून घेत असल्याने येथील नागरिकांची हेळसांड होताना दिसत नाही. या बँकेत विविध ग्राहकांना चांगली सेवा मिळत असल्याने आणि येथील उपकरनेही (ATM मशीन इत्यादी) ब्रँडेड असल्याने या बँकेतील ग्राहक हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत ही बँकेसाठी जमेची बाजू मानली जात आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) ला मार्च 2020 अखेर तब्बल 273 कोटी 26 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला होता. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ढोबळ नफ्यात सलग दुसऱ्या वर्षी देशात अव्वल ठरली होती. देशातील सर्वाधिक नफ्याचा स्वत:चाच विक्रम बँकेने मोडला होता व सध्याही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.