Daund Police Announcement – मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज घरातच अदा करावी ! दौंड पोलिसांचे आवाहन



|सहकारनामा|

दौंड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. 21 जुलै रोजी बकरी ईद निमित्त होणारी नमाज मुस्लिम बांधवांनी घरातच अदा करावी असे आवाहन दौंड पोलिसांच्या वतीने  करण्यात आले आहे. ईद निमित्त येथील ईदगाह मैदानावर होणाऱ्या नमाज पठणासाठी फक्त पाच जणांनाच परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती दौंड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. 

कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव शहरातून अद्याप पूर्णपणे संपलेला नाही त्यामुळे प्रत्येक सणावर या महामारी चे सावट आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी सुद्धा ईद साजरी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कोरोना काळातील नियमांचे काटेकोर पालन करावे, मिरवणूक किंवा रस्त्यावरील गर्दी जमवुन कोणताच कार्यक्रम न घेता ईद शांततेत साजरी करावी असे आवाहनही ऋषिकेश अधिकारी यांनी केले आहे. 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी येथील शाही आलमगीर मशिदीचे मुख्य विश्वस्त युसुफ इनामदार तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.