यवत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, झाडावर चढून बसल्याने वाचले शेतकऱ्याचे प्राण

दौंड : दौंड तालुक्यातील यवत (अवचट मळा) येथे बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर आलेल्या बिबट्याच्या तावडीतून वाचण्यासाठी या शेतकऱ्याने झाडाचा आधार घेऊन लोकांना बोलविल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
घडले असे की काल रविवारी दुपारी साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास घनश्याम अवचट यांच्या शेतामध्ये त्यांची शेती करणारे रमेश कुदळे हे उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक उसातून वाघाची डरकाळी फोडण्याचा आवाज त्यांना ऐकू आला आणि पाहतात तर काय त्या उसाच्या शेतीतून बिबट्या बाहेर येऊन थेट त्यांच्या अंगावर येऊ लागला.
समोर बिबट्या पाहून घाबरलेल्या कुदळे यांनी हातातील खोरे बिबट्याच्या दिशेने भिरकावून जवळील लिंबाच्या झाडाचा आधार घेत त्यावर चढले व अवचट मळ्यातील लोकांना जोरजोरात हाका मारू लागले त्यांचा आवाज ऐकून सुजित अवचट, मनोहर अवचट, दत्ता बदर, मंदार अवचट, विशाल वाडेकर, बापू कांबळे यांनी गाड्यांचे हॉर्न आणि फटाके वाजवत ते त्याठिकाणी गेले त्यामुळे बिबट्या घाबरून पुन्हा उसाच्या शेतात पळून गेला. कुदळे ज्यावेळी झाडावर चढले होते त्यावेळी बिबट्या त्यांच्यावर चाल करण्याचा प्रयत्न करत होता अश्या वेळी ते जोरजोरात ओरडत राहिल्याने बिबट्या काहीकाळ स्तब्ध होत होता अशी माहिती त्यांनी दिली.
दिवसा एक तास फक्य लाईट दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेताला पाणी द्यायला जावे लागते. आजचा हा किस्सा घडल्यानंतर दिवसाच आठ तास लाईट द्यावी, रात्रीची नको कारण बिबट्याचा हल्ला रात्रीच्यावेळी कधीही होऊ शकतो अशी भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.