‛हिजाब’ प्रकरण आणि देशातील बिघडलेल्या वातावरणावर खा.सुप्रिया सुळे झाल्या आक्रमक, ‛लोकसभेत’ उपस्थित केले विविध ‛मुद्दे’

नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना खा.सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज प्रखर भूमिका मांडली. यावेळी खा.सुळे यांनी विविध मुद्यांवर पक्षाची भूमिका व मते मांडताना, कोणते कपडे घालायचे ते आता ‘हेच’ ठरविणार? काय खायचं ते ‘हेच’ ठरविणार? कुठे जायचं आणि कधी जायचं तेही ‘हेच’ ठरविणार? काय बोलायचं, काय नाही बोलायचं, ते पण ‘हेच’ ठरविणार?
काय शेअर करायचं, काय फॉरवर्ड करायचं, ‘हेच’ सांगणार? मग यांना हुकूमशाह म्हटले की, हे ‘आणीबाणी’चा राग आळवणार. त्यांच्यावर टीका केली तर राष्ट्रदोहाचा खटला टाकणार. लोकशाहीसाठी आंदोलन केले तर “आंदोलनजीवी” म्हणून हेटाळणी करणार.

लोकहो, आता तुम्ही काय करणार?
श्वास कोंडलेल्या अवस्थेत संकट आपल्या दारात येण्याची वाट पाहणार, की याविरोधात उभे राहणार? या शब्दांमध्ये खा.सुप्रिया सुळेंनी देशातील काही ज्वलंत मुद्यांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

यावेळी त्यांनी, देशाच्या अर्थमंत्री आणि मी देखील एका मुलीची आई आहे. आम्हा दोघींनाही त्याचा अभिमान आहे. कर्नाटकात जी दुर्दैवी घटना घडलीय, यावर काही सदस्य खुप छान बोलले आहेत. त्यांच्याशी काही मुद्यांबाबत मतभेद असून शकतात पण ते छान बोलले. कर्नाटकातील भाजपाच्या एका आमदारांचे विधान आहे.

ते म्हणतात की, महिला ज्या पद्धतीचे कपडे घालतात त्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हिजाब घातला तर भाजपाला त्याची अडचण आहे. दुसरे कपडे घातले तरी त्यांना त्याची अडचण आहे. म्हणजे तुम्ही मॉरल पोलिसिंग पण करणार आणि थॉट पोलिसिंग पण करणार?? माननीय मंत्री महोदया कर्नाटकातून निवडून येतात. मी त्यांच्याकडे न्यायाची मागणी करते. या अशा प्रकारच्या विधानाचा या सभागृहाने एकमुखाने विरोध करायला हवा. प्रत्येकाच्या घरी बायको, मुलगी, बहीण आहे. या अशा विधानाचा आपण सर्वांनी विरोध करायलाच हवा असे त्यांनी म्हणत सभागृह दणाणून सोडले.
अर्थसंकल्पावर बोलताना त्यांनी, माननीय अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करीत असताना अतिशय सुंदर अशी हातमागावर विणलेली ओरीसातील संभलपुरी साडी परीधान केली होती. त्या पेहरावात त्या अतिशय छान दिसत होत्या. आम्ही सर्वजण भारतीय पेहरावाचा सन्मान करतो. अर्थमंत्र्यांनी हातमागावर विणलेल्या कापडावरील कर दोन टक्क्यांनी कमी केला. आम्ही त्याचे स्वागत करतो. आम्हाला भारतीय परंपरांचा अभिमान आहे. पण कोणतीही व्यक्ती महिलांच्या बाबतीत अशा प्रकारचे विधान करीत असेल तर त्याचा एकमुखाने विरोध करायलाच हवा असेही त्यांनी म्हटले.
घराणेशाहिवर टिकेबाबत त्यांनी बोलताना, या सभागृहातील एका माननीय सदस्यांनी घराणेशाहीचा उल्लेख केला. मला एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की रवी सुब्रह्मण्यम् हे कोण आहेत ? माझ्यापुरते विचाराल तर मी कुणाची मुलगी आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मला त्याची अजिबात लाज वाटत नाही उलट अभिमानच वाटतो. प्रीतम मुंडे, पूनम महाजन, हिना गावित, रक्षा खडसे, सुजय विखे-पाटील. ज्योतिरादित्य सिंधिया जे आता मंत्री आहेत, पियूष गोयल, धर्मेंद्र प्रधान हे कोण आहेत ? हे सगळे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. मला त्यांचा अभिमान वाटतो. ते माननीय सदस्य म्हणाले की मोदीजींचा काळ सुरु होण्यापुर्वी कोणतेही उद्योगधंदे निर्माण झाले नाहीत. ते ज्या बंगलोर शहरातून येतात तेथे विप्रो, इन्फोसिस या मोठ्या कंपन्या आहेत.ज्या पूनावालांना तुम्ही पद्मविभूषण देऊन गौरविले त्यांची पुण्यात सिरम नावाची कंपनी आहे. विप्रो, इन्फोसिस, किर्लोस्कर, सिपला, अंबानी, बजाज, इन्फोसिस, बजाज, कल्याणी, वालचंद ग्रुप, फिरोदियाज्, पूनावाला, धूत या सगळ्या कंपन्यांनी मोठे योगदान दिले आहे. अगदी शून्यांतून सुरुवात करुन या सर्वांनी संपत्ती निर्माण केली, नोकऱ्या निर्माण केल्या.

त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करु नका.
वित्तीय तूट वाढविण्यात आली असून ती ६.९ करण्यात आली आहे. यामागची भूमिका काय आहे आणि त्याचा राज्यांना मिळणाऱ्या आर्थिक निधीवर काय परिणाम होईल याबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्राच्या वाटणीचा जीएसटीचा परतावा २८ हजार ३६५ कोटी एवढा शिल्लक आहे. वित्तीय तूट वाढविल्याने त्यावर काय परिणाम होईल याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशीही मागणी खा.सुप्रिया सुळे यांनी शेवटी केली आहे.