|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
अष्टविनायक महामार्गाच्या रस्ता कामाला मुरूम पुरविणाऱ्या कडून पैसे उकळणाऱ्या खंडणीखोरास दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अंकुश रामचंद्र वणवे(रा. अंबिका नगर, पाटस, दौंड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून राजेश पांडुरंग लाड(रा. पाटस, दौंड) याला अटक करण्यात आली आहे.
घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव ते दौंड हद्दीमध्ये अष्टविनायक महामार्गाचे काम सुरू आहे. या कामावर फिर्यादी व त्यांचे मित्र रस्ता कामाच्या ठेकेदाराला मुरूम पुरवितात. तालुका दंडाधिकारी यांच्या रीतसर परवान्याने फिर्यादी रोटी गावातील जमिनीतून मुरूम उचलतात व आपल्या वाहनाने सदर रस्ता कामावर मुरूम टाकले जाते.
दि.20 जुलै रोजी फिर्यादी यांना त्यांच्या वाहन( टिपर) चालकाचा फोन आला की टिपर मुरूम भरून आला आहे मात्र संध्याकाळ झाल्याने तो आता साइटवर खाली करता येणार नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी चालकास तो टिपर त्यांच्या पाटस येथील मित्राच्या घरासमोर उभा करण्यास सांगितले. चालक टिपर घेऊन त्या ठिकाणी गेला असता आरोपी राजेश लाड हा दुचाकीवर त्यांचा पाठलाग करत तेथे आला व त्याने दमदाटी करून मुरुमाने भरलेला टिपर तेथेच खाली करून घेतला व त्याचे मोबाईल मध्ये फोटो काढले.
घाबरून चालकाने ही बाब फिर्यादीस कळविली, त्यामुळे लागलीच फिर्यादी त्याठिकाणी पोहोचले असता लाड त्या वाहना समोरच उभा होता. त्या मुळे फिर्यादीने त्याच्याशी बोलणी केली असता तू मला 1 लाख रुपये दिले तरच मी तुझे वाहना बाबत तक्रार करणार नाही, पैसे दिले नाही तर तुझा टिपर मुरमा वरती कसा चालतो ते पाहतो म्हणत पैशाची मागणी केली. त्यामुळे फिर्यादी यांनी व्यवसायातील इतर मित्रांना त्या ठिकाणी बोलावून घेतले, दरम्यान आरोपी दुचाकीवरून निघून गेला होता.
फिर्यादी यांनी मित्रांना घडलेला प्रकार सांगितला त्यावेळी त्यांचे मित्र राजेंद्र घाडगे यांनी त्यांना सांगितले की माझ्या कडूनही आरोपी लाड याने अशीच दमदाटी करून, आमच्याही वाहनाचे फोटो काढून 20 हजार रु घेतलेले आहेत. व याबाबत कोठे वाच्यता केल्यास, मी सामाजिक कार्यकर्ता आहे तुम्हा मुरूम काढणाऱ्यांना मातीत गाडुन टाकीन अशी धमकी दिली होती. त्यामुळे सर्वांनी मिळून आरोपी राजेश लाड विरोधात दौंड पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी राजेश लाड यास खंडणी घेणे, खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
लाड विरोधात याआधीही पाटस पोलिसात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.