खासदार ओवेसी यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा दौंडमध्ये निषेध, राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्रालयाला निषेधाचे निवेदन

दौंड : ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे खासदार बॅरिस्टर ओवेसी निवडणुकीच्या प्रचारार्थ मेरठहुन दिल्लीला जात असताना काही समाज कंटकांनी त्यांच्यावर गोळीबार करीत जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा दौंड एम आय एम पक्षाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्री यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी यासाठी दौंड पोलीस स्टेशनला निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख तसेच हमीद शेख, अमीर शेख,इमतियाज शेख,दत्तात्रय जगताप ,सतीश यादव, अमीर शेख,आरिफ शेख, इरफान डफेदार, रमजान खान उपस्थित होते.
एमआयएम ने दिलेल्या निवेदनामध्ये, समाजकंटकांनी ओवेसी यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, यापूर्वीही त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानावर असाच हल्ला करण्यात आला होता. ओवेसी यांच्यावर वारंवार हल्ल्यामुळे देशातील गुप्तचर यंत्रणा अकार्यक्षम झाल्याचे संदेश समाजामध्ये पसरत आहेत. उत्तम संसदपटू पुरस्कारीत ओवेसीं सोबत अशा निंदनीय घटना घडणे ही बाब संशयकारक आहे त्याचा पक्षाकडून निषेध करण्यात येतो आहे. या हल्ल्यामागील खऱ्या मास्टरमाईंड ला त्वरित अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी व खासदार ओवेसींना झेड सिक्युरिटी प्रदान करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश राज्यात आगामी होणाऱ्या निवडणूका भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पडाव्यात, कायदा सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने या राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावेत अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. लोकशाही मार्गाने लढा देऊन आम्ही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रपती व केंद्रीय गृहमंत्री यांना घटनेच्या निषेधाचे निवेदन पाठवीत आहोत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.