दौंड शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई, विक्रेत्यांची दुकाने बंद पाडण्यात पोलिसांना आनंद नाही पण.. – पो.नि. घुगे

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या विक्रेत्यांवर दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पो.नि. घुगे व पोलीस पथकाने शहरातील गांधी चौक, आंबेडकर चौक,शालिमार चौक,सरपंच वस्ती या ठिकाणी फेरफटका मारून रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने, भाजी मंडईतील विक्रेते, चायनीज स्टॉल्स यांचे साहित्य जप्त करीत पोलीस स्टेशनला जमा केली. या सर्वांना पंधरा दिवस आधी अशा कारवाई संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या मात्र त्यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच प्रमाणे शहरातील प्रत्येक रिक्षाचालकाने गणवेष परिधान करूनच शहरात रिक्षा व्यवसाय करावा अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहेत, मात्र तरीसुद्धा काही रिक्षाचालक विना गणवेषच व्यवसाय करताना आढळले अशा रिक्षा चालकांवर ही पथकाने कारवाई केली. वाहनांना फॅन्सी नंबर प्लेट लावणे, विनापरवाना, विना नंबर वाहन चालविणे, विना मास्क शहरात फिरणे असे लोकही या कारवाईतून सुटले नाही.
शहरातील छोट्या व्यापाऱ्यांनी,रस्त्यावरील विक्रेत्यांनी आपला व्यवसाय जरूर करावा, त्यांची दुकाने बंद पाडण्यात पोलिसांना आनंद नाही. परंतु आपल्या व्यवसायामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणार नाही, सामान्यांना त्याचा त्रास होणार नाही याची प्रत्येक विक्रेत्याने काळजी घेण्यास हवी अशी पोलीस प्रशासनाची भूमिका आहे.