|सहकारनामा|
पुणे : दौंड तालुक्यातील युवा उद्योजक रामदास आखाडे यांच्यावर त्यांच्या उरुळी कांचन येथील हॉटेल गारवा समोरच खुनी हल्ला झाला आणि तीन दिवसांनी त्यांचा या हल्ल्यामुळे उपचार घेत असताना हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मात्र तीन दिवस होऊनही अजूनही मुख्य आरोपी जेरबंद केले गेले नसल्याने ग्रामिण भागामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या संतापाला कारणही तसेच असून हा हल्ला झाला त्यावेळी हॉटेल चे सीसीटीव्ही चालू असल्याने या सीसीटीव्ही मध्ये हल्लेखोर कैद झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात अजूनही हे हल्लेखोर शहर पोलिसांना सापडत नसल्याने पुणे शहर पोलिसांच्या कार्यतत्परतेवर यामुळे ग्रामिण भागातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रामदास आखाडे हे दौंड तालुक्यातील कासुर्डी, खामगाव येथील रहिवासी होते. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये उरुळी कांचन येथे जागा भाड्याने घेऊन हॉटेल गारवा सुरू केले. हॉटेल सुरू करताना त्यांनी आपल्या शेतातील तरकारी आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्याने काही अवधीतच हे हॉटेल इतके फेमस झाले की या हॉटेल समोर वाहने लावण्यासाठी जागा सुद्धा शिल्लक राहत नव्हती. कमी पैशात उत्कृष्ठ चविष्ठ भोजन आणि रामदास आखाडे यांचा मितभाषीपणा हि या हॉटेलची खासियत होती. मात्र व्यवसाय वादातून म्हणा किंवा अन्य काही कारण म्हणा या युवा उद्योजकाला हॉटेल समोरच तीक्ष्ण हत्याराने सपापसप वार करून संपविण्यात आले आणि दौंड तालुक्यासह उरुळी कांचन मधूनही या हत्येविषयी तीव्र अश्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाणे आणि त्याच्या अखत्यारीत असणारे उरुळी कांचन पोलीस ठाणे हे अगोदर ग्रामिण पोलिसांच्या (एस पी ऑफिसच्या) ताब्यात होते नंतर ते शहर हद्दीमध्ये समाविष्ट होऊन त्याचा कारभार हा पुणे शहर (कमिशनर ऑफिसच्या) अंडरमध्ये सुरू झाला. ग्रामिण पोलिसांकडे लोकल क्राईम ब्रँच म्हणजे LCB सारखी यंत्रणा ही खून, दरोडे सारखे भयानक कृत्य करणाऱ्या आरोपींना त्वरित जेरबंद करण्यात सक्षम ठरत आहे. आखाडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शहर पोलिसांची यंत्रणाही LCB पेक्षा दुप्पट गतीने हे काम पार पाडेल असा विश्वास येथील नागरिकांना होता मात्र तीन दिवस उलटले आणि आखाडे यांचा या गंभीर हल्ल्यात मृत्यूही झाला तरीही अजून मुख्य आरोपी सापडत नसल्याने आता मात्र शहर पोलीस यंत्रणेवर ग्रामिण भागातून संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. जे काम लोकल क्राईम ब्रँच तत्परतेने करत होती ते काम शहर पोलिसांकडून होताना इतकी दिरंगाई का होत असावी असा सवाल आता दौंड आणि हवेलीतून उपस्थित होऊ लागला आहे.
पुणे शहरात क्राइमचे ६ युनिट तसेच दरोडा प्रतिबंधक, खंडणी विरोधी, नार्कोटीक, प्रॉपर्टी सेल, सामाजिक सुरक्षा, आर्थिक गुन्हे शाखा, एटीएस असे बरेच युनिट कार्यरत आहेत.
पुणे ग्रामिण जिल्हयात फक्त एकच एलसीबी (LCB) युनिट कार्यरत आहे. जिल्हयातील गुन्हयाची व्याप्ती ही जिल्हयाचे क्षेत्रफळ तसेच लगतचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड, रायगड, नाशिक, अहमदनगर नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील गुन्हेगार शोध कामी तान येऊनही LCB चे काम चांगले आहे.