पुणे – बापरे, सोनाराने लावला चूना! लोकांचे 36 तोळे सोने आणि 14 लाख 24 हजार रुपयांची रोकड लंपास

पुणे : हवेली तालुक्यातील कोल्हेवाडी येथे असणाऱ्या एका सोनाराने एका केबल ऑपरेटर आणि अन्य लोकांना सुमारे 36 तोळे सोने आणि 14 लाख 24 हजार 500 रुपयांना चूना लावल्याची घटना घडली आहे.
याबाबत केबल ऑपरेटर राहुल शंकर गायकवाड (रा. गणेशनगर, बोपोडी गावठाण आंबेडकर चौक, पुणे) यांनी संबंधित सोनारा विरोधात फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोल्हेवाडी येथील भाग्यलक्ष्मी ज्वेलर्सचा मालक देवीलाल कुमावत (मूळ गाव – बडखिया, पोस्ट पिपंली जि.राजसमंद, राजस्थान) याने दि.01/01/2020 ते दि. 02/12/2021 या कालावधीमध्ये फिर्यादी यांनी त्याच्याकडे विश्वासाने गहाण ठेवलेले 17 तोळे सोने व 9 तोळे सोने मोडुन बनविण्यास दिलेल्या 9 तोळे सोन्यापैकी 5 तोळे सोने तसेच अन्य 9 जणांचे 36 तोळे सोने व सोने विकत घेण्यासाठी दिलेले एकूण 14 लाख 24 हजार 500 रुपये घेऊन या आरोपीने सुमारे 10 लोकांची फसवणूक करून पोबारा केला आहे.
याबाबत स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सोने आणि सोने खरेदीसाठी पैसे घेऊन सदर इसमाने त्यांची मोठी फसवणूक केली असल्याने हवेली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.