आमदार ‛राहुल कुल’ यांनी ‛सहकारनामा’ ला बोलून दाखवलेली भीती खरी ठरली! कानगाव येथील शेतकरी आणि महावितरण कंपनी वाद पेटण्यामागे दोष कुणाचा

दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्यसरकारला एक पत्र लिहून त्यामध्ये शेतकरी, महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये वाद होण्याची भीती व्यक्त केली होती. व त्याबाबत सहकारनामाशी बोलताना त्यांनी ही भीती बोलून दाखवली होती. दि.9 जानेवारी रोजी याबाबत सहकारनामा ने वृत्त प्रसिद्ध केले होते. आणि काही दिवसांतच म्हणजे दि.17 जानेवारी रोजी कानगाव येथे शेतकरी आणि महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद होऊन यात सात ते आठ शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दि.9 जानेवारी 2022 रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमदार राहुल कुल यांनी लिहिलेले पत्र

आमदार राहुल कुल यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यामध्ये शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाविषयी माहिती दिली होती. आ.राहुल कुल यांनी या पत्रामध्ये लिहिताना… मागील अनेक महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, पूर, कोरडा दुष्काळा, ओला दुष्काळ, वादळ अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटाचा आघात होत असून यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाला आहे. त्यातच सक्तीने वीज बिलवसुली देखील सुरु केली आहे, त्यातच भर म्हणून कि, काय आता थकीत वीज बिलापोटी कृषीपंपाचे पॅनेल, स्टार्टर बॉक्स, विद्युत जोडणीची केबल सक्तीने काढून नेण्याचे काम महावितरणचे अधिकारी करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला असून, यामुळे काही ठिकाणी वादाच्या घटना देखील घडू शकतात. त्यामुळे हि बेकायदेशीर कारवाई तत्काळ थांबिण्याची गरज आहे. तरी, राज्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर सुरु असलेली कृषीपंपाचे स्टार्टर, पॅनेल बॉक्स व विद्युत वाहक तारा काढून नेण्याची कारवाई तत्काळ थांबविणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी त्यांनी केली होती.

सरकारने वेळीच आमदार राहुल कुल यांच्या पत्राची दखल घेत या विषयात लक्ष घातले असते तर आज परिस्थिती ओढवली नसती अशी चर्चा दौंड तालुक्यात होत आहे.