दौंडच्या उपनगराध्यक्षपदी ‛कांचन साळवे’ बिनविरोध

– अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपालिका, उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीच्या नगरसेविका कांचन अनिल साळवे यांची बिनविरोध निवड झाली. युतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष संजय चितारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवड प्रक्रिया आज दि. 12 जानेवारी रोजी नगरपालिका सभागृहामध्ये पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून नगरसेविका कांचन साळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता तर विरोधी नागरिक हित संरक्षण मंडळाकडून नगरसेवक बबलू कांबळे व अरुणा डहाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागरीक हित च्या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष शितल कटारिया यांनी कांचन साळवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नगरपालिकेतील 24 सदस्यांपैकी राष्ट्रवादी शिवसेना युतीचे 14 सदस्य तर नागरिक हित चे 10 सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असतानाही नागरिक हित मंडळाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काहीतरी चमत्कार होतो की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, मात्र राष्ट्रवादीने ती निष्फळ ठरविली. कांचन साळवे यांची निवड जाहीर होताच नगरपालिकेतील त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
कांचन साळवे 2017 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रभाग क्रमांक 7 मधील मागासवर्गीय प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. गृहिणी असलेल्या कांचन साळवे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि त्यांना पहिल्याच वेळेत पक्षाने उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. कांचन साळवे यांचे पती अनिल साळवे 2012 -17 या कार्यकाळात याच प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर त्यांचे मोठे दीर गौतम साळवे 2002-07 या कार्यकाळात नगरसेवक होते आणि ते सध्या विद्यमान स्वीकृत सदस्यही आहेत.
कांचन साळवे (सोनवणे) या मूळच्या दौंड मधील भिमनगर येथील रहिवासी आहेत. साळवे कुटुंबीय हे पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाने त्यांना न मागता उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली.